Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 23rd, 2019

  इनोव्हेशनविना कोणत्याही देशाची प्रगती शक्य नाही : विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार

  गटचर्चेमध्ये तज्ज्ञांनी दिला मंत्र

  नागपूर : ‘नॉलेज इज पॉवर’असे म्हटले जाते मात्र आज जगातील कोणतिही माहिती एका क्लिकवरुन क्षणामध्ये आपल्यापुढे सादर केली जाते. गुगलमुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. या इनोव्हेशनमुळे असंख्य कामांना गती मिळाली आहे. आपल्या भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक युवाशक्ती आहे. या युवांच्या डोक्यातील नवसंकल्पना पुढे येणे गरजेचे आहे. ‘इनोव्हेशन’हेच भविष्य असून युवांनी त्याच्याकडे लक्ष देउन काम करणे आवश्यक आहे. आज इनोव्हेशनविना कोणत्याही देशाची प्रगतीच शक्य नाही, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

  ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने शुक्रवारी (ता.२३) आयोजित गटचर्चेमध्ये ते बोलत होते. ‘इनाव्हेशन ड्रिव्हन सोसायटी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट वे ॲण्ड मिन्स’ या विषयावर आयोजित गटचर्चेमध्ये महापौर नंदा जिचकार, भारत सरकार एमएचआरडी चे इनोव्हेशन डायरेक्टर डॉ. मोहित गंभीर, केडीके महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख व प्राचार्य डॉ. सी.सी. हांडा, प्लॅनेट-व्ही इंडियाचे संचालक डॉ. विक्रमसिंग पाचलोरे, नागपूर फस्टचे तन्वीर मिर्झा, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख सहभागी झाले होते.

  यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्वत:च्या शैक्षणिक जीवनातील काही आठवणींना उजाळा दिला. विपरीत परिस्थितीत अनेक अपयश पचवून शेवटी ध्येय प्राप्त करताना इच्छाशक्ती आणि मेहनत या दोन गोष्टींनी काहीही शक्य होउ शकल्याचे महत्व त्यावेळीही पटले व आजही उपयोगी पडत आहे. त्यामुळे इच्छाशक्तीला मेहनतीची जोड द्या व कोणत्याही कामाच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून द्या, असा मंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

  महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ विरंगुळा केंद्र, महिलांसाठी महिला उद्योजिका केंद्र, तरुणांच्या नवसंकल्पनांना पंख देण्यासाठी ‘मेयर इनोव्हेशन कौन्सिल’, त्याच माध्यमातून हॅकेथॉन, महापौर इनोव्हेशन अवार्ड, इनोव्हेशन पर्व असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात शहरात अनेक इनोव्हेटिव्ह प्रकल्प सुरू आहेत. याच प्रकल्पांमध्ये आपले योगदान म्हणून रोजच्या दैनंदिन समस्यांबाबत आपल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  भारत सरकार एमएचआरडी चे इनोव्हेशन डायरेक्टर डॉ. मोहित गंभीर यांनी रोजच्या दैनंदिन जीवनात भेडसावणा-या समस्यांचे, अडचणींचे उत्तर आपल्या इनोव्हेशनच्या माध्यमातून शोधण्याचे आवाहन यावेळी केले. देशामध्ये पायलट मिशन प्रमाणेच इंडो मिशन राबविणे हे ध्येय असल्याचे ते म्हणाले.

  तत्पुर्वी याच विषयावर झालेल्या गटचर्चेत नीरीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पवन लाभसेटवार, जीआयझेड-एमएसएमईचे कन्सल्टन्ट डॉ. रवींद्र अहेर, विदर्भ बिझनेस फोरमचे सीईओ आर्की. नीलेश राहाटे, युवा मार्गदर्शक श्रीयश जिचकार, एल ॲण्ड टी इन्फोटेकच्या कन्सल्टन्ट नेहा मालीकर, बंगळुरू येथील श्री. श्रीकांत, विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीचे श्री. दुष्यंत यांनी सहभाग घेतला. दोन्ही गटचर्चेचे समन्वयन मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू यांनी केले.

  सहभागी संकल्पनांची छानणी
  इनोव्हेशन पर्वमध्ये हजारावर नवसंकल्पनांची नोंदणी करण्यात आली आहे. या सहभागी नवसंकल्पनांच्या सादरीकरणानंतर त्यांची उद्या शनिवार (ता.२४)पर्यंत प्राथमिक छानणी तज्ज्ञ परीक्षक मंडळाद्वारे करण्यात येणार आहे. यानंतर या संकल्पना मनपा व शासनाच्या अन्य विभागाद्वारे तपासून त्यानंतरच त्याची उपयोगीता ठरविण्यात येईल, असे मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू यांनी सांगितले.

  ‘स्टार्ट अप फेस्ट’चे उद्घाटन शनिवारी
  ‘इनोव्हेशन पर्व’च्या दुस-या दिवशी शनिवारी (ता.२४) ‘स्टार्ट अप फेस्ट’ व ‘द ॲसिलरेट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्टार्ट अप फेस्ट’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पनांना उद्योगामध्ये कशाप्रकारे परिवर्तीत करता येईल, याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. तर ‘द ॲसिलरेट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उद्योगाला आर्थिक मदत कशी देता येईल, शासनाच्या कुठल्या योजनांचा लाभ घेता येईल, बँकांचे काय सहकार्य मिळू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित स्टार्ट अप फेस्ट च्या उद्‌घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, यू-ट्यूब निर्माते रणवीर अल्लाबाडिया, एमएचआरडीचे इनोव्हेशन डायरेक्टर मोहित गंभीर, नॅशनल प्रो-ॲथॅलेट गौरव तनेजा, सिरीयल आंतरप्रीनर छेट जैन यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे. शनिवारी (ता.२४) सायंकाळी ६ ते १० दरम्यान ‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145