Published On : Wed, May 16th, 2018

यूएसएआयडीच्या सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई: व्यापार, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात यूएसएआयडीच्या (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट) सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यूएसएआयडीच्या शिष्टमंडळाने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. शिष्टमंडळात यूएसएआयडीचे प्रशासकीय प्रमुख ग्रेगरी ह्युगर, यूएस कौन्सुल जनरल एडगार्ड कागन, प्रकल्प संचालक कॅथरीन स्टिव्हन्स यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई-अफगाणिस्तान (काबुल) विमानसेवा सुरू असल्याने रूग्ण सेवेत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातर्फे अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाला सहकार्य करण्याबाबतही त्यांनी सांगितले.

सप्टेंबर-२०१८ मध्ये मुंबईत होणाऱ्या भारत-अफगाणिस्तान व्यापार व विकास कार्यक्रमात सहभाग घेऊन सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

श्री. ह्युगर म्हणाले, शैक्षणिक, व्यापार या संबंधाबरोबर भारताशी आणि महाराष्ट्राशी अधिक संबंध दृढ करायचे आहेत. मुंबई हे व्यापाराचे मध्यवर्ती केंद्र आहे, इथे आम्ही १०० मिलिअन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.


यावेळी राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा उपस्थित होते.