Published On : Fri, Jun 11th, 2021

योग्य नियोजनातून शहापुरने थोपविली कोरोनाची दुसरी लाट

– शहापूरचे सरपंच मोरेश्वर गजभिये यांना मिळाली मुख्यमंत्र्यांशी संवादाची संधी

भंडारा :- ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनातून कोरोनाच्या दुसरी लाट थोपविण्यात शहापूर ग्रामपंचायत यशस्वी ठरली असून 45 वर्षावरील 90 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्क, सॅनिटाइझर व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे आजही काटेकोर पालन होत आहे. मुख्यमंत्री म्हणून आपण आमच्या सोबत भक्कमपणे उभे असल्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेला आम्ही गावकरी योग्य नियोजनाने गावात प्रवेशसुद्धा करू देणार नाही, असे विश्वास शहापूरचे सरपंच मोरेश्वर गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलतांना व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी सरपंच व गावकऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील निवडक सरपंचांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधला असता सरपंच गजभिये यांनी शहापूर गाव कसे कोरोनामुक्त केले याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, उपजिल्हाधिकारी अर्चना पोळ व खंड विकास अधिकारी नूतन सावंत यावेळी उपस्थित होते.


पाच हजार लोकवस्ती असलेलं शहापूर हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे वर्दळीचे ठिकाण आहे. पहिल्या लाटेतही या गावाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले. संपूर्ण गावाचे निर्जंतुकिकरण केले. दुसऱ्या लाटेत मात्र संसर्ग आधीच्या पेक्षा जास्त होता. गाव समिती, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कोरोनावर मात केली. प्रत्येकाची चाचणी, गावाचे निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतर यामुळे गाव कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे.

कोरोनाच्या कालावधीत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी, डॉक्टर, नर्स व आरोग्य यंत्रणेने अतिशय मोलाचे सहकार्य केल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

31 मे पर्यंत 231 नागरिक पॉझिटिव्ह होते. 11 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता परिस्थिती आटोक्यात असून सध्या शहापूरचा पॉझिटिव्हीटी रेट शून्य आहे आहे. 45 वर्षावरील 90 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून उर्वरित सर्व नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार असल्याची ग्वाही गजभिये यांनी यावेळी दिली. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी केली असून गावातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

शहापूर गावाने कोरोना मुक्तीसाठी चांगले काम केले आहे. दुसरी लाट कमी झाली असली तरी गाफिल राहून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन करायचेच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनावश्यक गर्दी टाळा व खबरदारी घ्या असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.