
नागपूर – महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अधिसूचना जारी करत अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून नागपुरातच सुरुवात होईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र अधिवेशन किती दिवस चालणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
या वर्षीचे हिवाळी अधिवेशन तापलेले वातावरण निर्माण करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, राज्यात सध्या २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबरला पार पडणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होतील. त्यानंतर जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्यपालांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अधिवेशन ठरल्याप्रमाणेच सुरू होणार आहे.
राज्य सरकारने अधिवेशनाच्या तयारीला वेग दिला असून नागपुरात सुरक्षा, निवास, वाहतूक व्यवस्था यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात येत आहेत. विधानसभा सचिवालयाने सदस्यांना आवश्यक सूचना पाठवल्या असून मंत्र्यांचे तात्पुरते निवास व कार्यालय नागपुरात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सचिवालयाचे कामकाजही नागपूरात सुरू होणार असल्याने शहरात राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.
अधिवेशनादरम्यान नागपुरातील रेल्वे व हवाईसेवा वाढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विधान भवन परिसरासह संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनाती करण्यात येणार असून पोलिसांनी स्वतंत्र सुरक्षा आराखडा तयार केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी येणार आहे.










