
नागपूर – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठ्या घडामोडी घडू लागल्या असून, महापालिका निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून, सर्वच पक्ष तयारीच्या अंतिम टप्प्यात आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर होऊ शकते. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर कधीही आदर्श आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महत्त्वाच्या निर्णयांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यावेळी राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
याआधी नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे पुढे ढकलल्या जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ताज्या माहितीनुसार या दोन्ही महापालिकांसह राज्यातील सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकत्रच घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापालिकांसाठी मतदान 12 जानेवारीनंतर होण्याची शक्यता असून, मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करण्याचे नियोजन आयोगाकडून केले जात आहे. न्यायालयीन आदेश, कायदेशीर बाबी आणि कमी कालावधी लक्षात घेता निवडणूक आयोग अत्यंत काटेकोर नियोजन करत असल्याचे चित्र आहे.
न्यायालयाने दिलेल्या 31 जानेवारी 2026 या अंतिम मुदतीमुळे निवडणूक आयोगाकडे सध्या अवघे 50 ते 52 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम एकामागून एक जाहीर होण्याची शक्यता असून, येत्या काही आठवड्यांत महाराष्ट्राचे राजकारण तापणार, हे निश्चित मानले जात आहे.








