माझ्या नावातच ‘जीत’, मीच जिंकणार ! अॅड. अभिजीत वंजारी यांचा ठाम विश्वास
नागपूर: माझ्या नावातच ‘जीत’ आहे. त्यामुळे यावेळची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मीच जिंकणार, असा ठाम विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चार दिवसांवर आली असून आता वातावरण अधिक तापू लागले आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी कॅांग्रेस, शिवसेना, पिरिपा ( कवाड़े गट), आरपींआय (गवई गट) आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या मागील दहा दिवसांपासून विविध ठिकाणी प्रचार सभा सुरू असून त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या सभांच्या शृंखलेतील आणखी एक सभा नागपुरातील पाचपावली येथील सिंधू महाविद्यालयात घेण्यात आली. या सभेला उर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर प्रसन्न तिडके, हरीष भाकरू, मोहन वासनिक, पांडे इत्यादींची उपस्थिती होती.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदवीधरांच्या समस्या सोडवून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणे, प्रत्येक क्षेत्रातील पदवीधराला उज्ज्वल भविष्य देणे, कौशल्य विकासासोबत त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा आता एकच ध्यास आहे. शिक्षक, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर पदवीधर मतदार संघातही परिवर्तनाची नितांत गरज आहे आणि हे परिवर्तन घडवून आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे, असे अॅड. अभिजीत वंजारी म्हणाले,
डॉ. नितीन राऊत यांनी पदवीधरांच्या समस्या निराकरण व विकासाकरिता कार्य करण्यासाठी अॅड. वंजारी यांनाच निवडून द्या, असे आवाहन यावेळी केले.