Published On : Mon, Sep 9th, 2019

बुटीबोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे ठाणेदाराच्या बदल्यांचे ग्रहण सुटेल का?

टाकळघाट:- बुटी बोरी औधोगिक क्षेत्रात वाढत्या चोऱ्या,अवैध धंदे,कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात उद्भवणारे वाद यांचेवर नियंत्रण मिळविण्याकरिता बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती केली होती.परंतु पोलीस स्टेशन निर्मितीला आता सध्या तीन वर्षच पूर्ण झाली असून तीन वर्षात येथे सातवे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे हे रुजू झाले आहेत.

१ जुलै २०१६ रोजी बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री,ऊर्जा व उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले होते.त्यावेळी बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पाहिले पोलीस निरीक्षक म्हणून मनीष दिवटे यांनी मान पटकाविला होता.त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ही जागा महिनाभर रिक्तच राहिली.

परंतु पोलीस निरीक्षकाच्या अनुपस्थितीत पोलीस कर्मचारी हे सैराट होऊन तडीपार गुंडासह अजमेर वारीला गेल्यामुळे त्यांचे जागी मौला सय्यद यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.व पोलीस स्टेशनला रुजू होताच अवघ्या दहा दिवसांत बदली सुद्धा केली.त्यानंतर १३ ऑक्टो २०१६ ला संतोष वैरागडे यांची नियुक्ती करण्यात आली व १२ जुलै २०१७ ला त्यांचीही बदली करण्यात आली होती.जणू काही अवघ्या नऊ महिन्यातच त्यांनाही डोहाळे लागल्यामुळे त्यांचे जागी चौथे पोलीस निरीक्षक मधुकर गीते हे १२ जुलै २०१७ ला रुजू झाले.व त्यांची बदली २४ ऑक्टो २०१८ ला करण्यात आली.

पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हेगारांवर चांगलीच जरब बसविली होती.त्यांच्या काळात पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैद्य धंदे,मटका,जुगार,चोऱ्या यावर चांगलाच अंकुश लावला होता.परंतु त्यांचीही अचानक तडका फडक बदली करून त्यांचे जागी २५ ऑक्टो २०१८ ला हेमंत चांदेवार यांची नियुक्ती केली.त्यांनाही अवघे चार महिने ठेवून त्यांचे जागी दि २० फेब्रु २०१९ ला प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लांघी यांना आणण्यात आले.परंतु ऑक्टो २०१९ मध्ये होऊ घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी जिल्हा बदलीच्या नावे त्यांचीही अवघ्या सहा महिन्यात बदली करण्यात आली असून त्यांचे जागी विनोद ठाकरे यांची बुटी बोरी एम आय डी सी चे सातवे पोलिस निरीक्षक म्हणून नेमण्यात आले असून दि ६ सप्टें ला ते पोलीस स्टेशनला रुजू झाले आहे.

विशेष बाब म्हणजे पोलीस स्टेशन च्या स्थापनेला अवघे तीन वर्षे झाली आहे.तीन वर्षात दोन ते तीन ठाणेदार व्हायला पाहिजे होते परंतु याठिकाणी आतापर्यंत सहा ठाणेदार येऊन गेल्यामुळे नव्याने रुजू झाले पोलीस निरीक्षक ठाकरे किती दिवसाचे पाहुणे आहे अशा चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाची बाब अशी की,पोलीस निरीक्षकांच्या या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे येथील अवैध धंदेवाईक यांना चांगलेच पेव फुटले असून परिसरात अवैध धंदेवाईकांची चांगली चांदी झाली आहे.मटका,जुगार,वेश्या व्यवसाय,बंद कंपन्यांतील भंगार चोऱ्या यांचेवर पोलिसांचे अंकुश राहिले नसून गुन्हेगार सध्याघडीला निर्ढावल्या सारखे वागताना दिसत आहे.त्यामुळे बुटी बोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे ठाणेदाराच्या बदल्यांचे ग्रहण सुटेल का? असा प्रश्न येथील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.