Published On : Tue, Nov 26th, 2019

काम केले नाही तर कठोर कारवाई करणार !: महापौर

‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’ कार्यक्रमात अधिकाऱ्यांना कडक इशारा

नागपूर : जनतेची कामे करणे हे महापालिका कर्मचारी व अधिकारी यांचे प्रथम कर्तव्य आहे. आता नागरिकांच्या समस्या किंवा प्रश्न मार्गी लावले नाही तर कठोर कारवाई करू. वेळप्रसंगी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, अशा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

मंगळवारी (ता.२६) धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या गांधीसागर तलावाजवळील चाचा नेहरू बाल उद्यानात ‘वॉक अॅंड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांच्यासह क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, अग्निशमन व विद्युत समिती सभापती ॲड संजय बालपांडे, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका हर्षला साबळे, झोन सहायक आयुक्त किरण बगडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी नगरसेविका रश्मी फडणवीस, माजी नगरसेवक मनोज साबळे, गांधीसागर उद्यान कल्याणकारी समितीचे राजेश कुंभलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण चाचा नेहरू उद्यानाची पाहणी केली. उद्यानात काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आल्याने महापौर संदीप जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. उद्यानातील खेळणीही नादुरूस्त असल्याचे दिसून आल्याने महापौरांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता हे उद्यानात दर्शनी भागात तीन दिवसाच्या आत लावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. उद्यानातील खेळणी बसविण्य़ाचे कार्यादेश झालेले आहे. पुढील आठ दिवसात उद्यानात खेळणी बसविण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले. उद्यानातील ग्रीन जीमही नादुरूस्त अवस्थेत आहे. तेही दुरूस्ती करण्यात यावी. या उद्यानाचे वा ग्रीन जीमच्या देखभाल दुरूस्तीचे कंत्राट ज्या कंत्राटदाराकडे आहे, त्यांनी कामे केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तलावाभोवती संरक्षण भिंत लावण्याबाबतही विचार कऱण्यात यावा, असेही महापौर यांनी सांगितले.

यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या महापौर संदीप जोशी यांच्यापुढे मांडल्या. वीणा भुते यांनी उद्यानात योग शिबिर आयोजित करण्याबाबत समस्या मांडली. अरूण देशकर यांनी रतन कॉम्पलेक्सच्या मागील बाजूस घाणीचे साम्राज्य असते, त्याठिकाणी कचरा साचून राहतो, अशी समस्या मांडली. राजेश कुंभलकर यांनी बस स्टॅड ते मॉडेल मिल परिसरात खासगी बसेस उभ्या राहतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याशिवाय उद्यानासमोरील रस्ता हा वर्दळीचा असल्याने याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना अडचण जाते, त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावावे, अशी समस्या मांडली. माणिकलाल कोंबर्डे यांनी उद्यानात ग्रीन जीम दुरूस्ती करण्याच्या सूचना केल्या. कल्पना गुंडेकर यांनी परिसरातील असामाजिक तत्त्वे मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची तक्रार केली. संजय पाटील यांनी तलावात आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याची समस्या मांडली. गगन काळे यांनी परिसरात चिकन मटन विक्रेते यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार केली. मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेच्या संदर्भातील समस्या होत्या. कचरा घऱाजवळ साचून राहतो, त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होते. अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत्या. यावर बोलताना महापौर यांनी कचरा उचलणारी यंत्रणा ही नवीन असल्यामुळे त्यांना कामे समजायला वेळ लागतो आहे. येत्या ३० तारखेपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, नागरिकांना कुठेही कचरा दिसणार नाही, असे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले.

अग्याराम देवी मंदिराजवळ खासगी बसेस उभ्या राहतात, ही समस्या बऱ्याच नागरिकांनी मांडली. यावर महापौरांनी पत्र देण्यास सांगितले. लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही महापौर यावेळी बोलताना म्हणाले. याव्यतिरिक्त अमोल शंभरकर, प्रशांत तिळगुळे, सुरेश कळमकर, भोलेश्वर तिवारी, अशोक बनसोड, अशोक रणदिवे, श्री राऊत यांनीही आपल्या समस्या यावेळी महापौरांपुढे मांडल्या.

याव्यतिरिक्त नागरिकांनी काही सूचना महापौर संदीप जोशी यांच्यापुढे मांडल्या. संजय मेंडूलवार यांनी शासनाच्या उपक्रमांची माहिती असणारे पोर्टल तयार करावे अशी सूचना केली. शासनाच्या उपक्रमांची माहिती व समस्या तसेच सूचना मांडणारे ॲप तयार कऱण्याबाबत सूचना होत्या. काही ठिकाणी अतिक्रमण वाढल्याच्याही तक्रारी नागरिकांनी मांडल्या. सर्व समस्यांच्या पाठपुरावा करून समस्येचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले. नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांना उत्तर देताना महापौर संदीप जोशी म्हणाले, आपल्या सुविधेच्या दृष्टीने करण्यात येणा-या तक्रारी आणि विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरातून निघणारा कचरा ओला आणि सुका असा वर्गीकृत करूनच द्यावा, असे आवाहनही यावेळी महापौर संदीप जोशी यांनी केले.

१२ डिसेंबर रोजी तक्रार निवारण शिबिर

नागरिकांच्या समस्या व तक्रारी निवारण करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात येत असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या सर्व नागरिकांच्या समस्या व तक्रारी सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या दरम्यान झोनस्तरावर आपली तक्रार स्वीकारण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

आपल्या सूचनांचा आदर करणार – महापौर

नागरिकांनी कामे करताना आपली सूचना देण्यासाठी सूचना पेटी ठेवण्यात येणार आहे. यासूचना पेटीमध्ये आपल्या तक्रारी व सूचना मांडाव्यात. आपल्या सूचनांचा आदर केला जाईल, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.