Published On : Tue, Nov 26th, 2019

जनतेच्या स्वप्नातील शहर निर्माण करण्यासाठी सर्वांनी कार्य करा!

Advertisement

महापौर संदीप जोशी यांनी साधला नगरसेवकांशी संवाद : समस्या व तक्रार निराकरणासंदर्भात लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमध्ये बैठक

नागपूर : नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. स्वच्छता, पाणी, वीज, अतिक्रमण मुक्तता अशा नागरिकांच्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यांच्या सूचना आणि संकल्पना मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहराच्या विकासात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग करणे हा आपला उद्देश आहे. यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासह त्यांच्या सूचना आणि संकल्पनांचा कसा उपयोग करता येईल यासाठी प्रयत्न करावे. आपले नागपूर शहर हे प्रत्येक नागपूरकराच्या स्वप्नातील शहर म्हणून पुढे यायला हवे, यादृष्टीने प्रत्येकाने कार्य करा, असे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

Advertisement

मनपा क्षेत्रातील झोन निहाय समस्या आणि त्याचे निराकरणासंदर्भात मंगळवारी (ता.२६) महापौर संदीप जोशी यांनी लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. याप्रसंगी लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, माजी महापौर नंदा जिचकार, नगरसेविका सोनाली कडू, पल्लवी शामकुळे, वनिता दांडेकर, उज्ज्वला बनकर, नगरसेवक लखन येरवार तसेच धरमपेठ झोनमधील बैठकीत झोन सभापती अमर बागडे, नगरसेवक सर्वश्री संजय बंगाले, निशांत गांधी, प्रमोद कौरती, कमलेश चौधरी, किशोर जिचकार, सुनील हिरणवार, नगरसेविका वर्षा ठाकरे, रूपा राय, प्रगती पाटील, रूतिका मसराम, उज्ज्वला शर्मा, शिल्पा धोटे, दर्शनी धवड आदी उपस्थित होते.

अतिक्रमणासंदर्भात दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत
झोनमधील कचरा आणि अतिक्रमणाच्या समस्येबाबत प्रभागनिहाय आढावा यावेळी महापौरांनी घेतला. शहरातील अतिक्रमणाच्या समस्यांबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबत नगरसेवकांशी चर्चा करून त्यांच्या सूचनाही यावेळी महापौरांनी मागविल्या. अतिक्रमणाच्या समस्येने संपूर्ण शहरातील नागरिक त्रस्त आहेत. अतिक्रमण हटविण्याबाबत मनपातर्फे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात येणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले. याशिवाय अतिक्रमणाबाबत लवकरच विशेष सभाही आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

कच-याच्या संदर्भातही संपूर्ण शहरात समस्या आहेत. कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी मनपा तर्फे ए.जी.इन्व्हारयो व बीव्हीजी या दोन एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. झोन एक ते पाचसाठी नियुक्त ए.जी.इन्व्हारयोच्या कामाचाही यावेळी महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. कच-याचे योग्य संकलन आणि व्यवस्थापनासंदर्भात एजन्सीने आपला प्लॉन सर्व नगरसेवकांना सादर करावा व त्वरीत कच-याच्या सर्व समस्या मार्गी लावून पुढे कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया सुरळीत करावी, असे निर्देशही यावेळी महापौरांनी दिले.

ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वत:पासून सुरूवात करा
नव्या एजन्सीला नियुक्त केल्यानंतर आता आपल्या भविष्याच्या दृष्टीने ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्याचे योग्य संकलन आणि व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्र विलग करण्याबाबत जनजागृती करताना लोकप्रतिनिधी म्हणून आपणच पुढाकार घेउन त्याची स्वत:पासून सुरुवात करावी, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी नगरसेवकांना केले.

आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे यामध्ये नागरिकांचा सहभाग असावा यासाठी नागरिकांशी विविध माध्यमातून संवाद साधला जात आहेच याशिवाय लवकरच चौक सौंदर्यीकरण स्पर्धा घेउन शहराचे सौंदर्य अधिक वाढविले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement