नागपूर : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या चर्चांमध्येच नागपुरातील कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे देखील पक्षाची साथ सोडणार अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरु होती.
उमरेड विधानसभाचे आमदार राजु पारवे हे देखील पक्ष सोडून जातील असे बोलल्या जात होते.
मी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. मी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस पक्षात काम केले. मात्र, चव्हाण यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे आमदार विकास ठाकरे म्हणाले. अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही काँग्रेस सोडणार, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, याबाबतच्या चर्चेत तथ्य नसल्याचे वडेट्टीवार यांनीही स्पष्ट केले आहे.