नागपूर –एका आजारी पतीचा खून करून त्याची पत्नी आणि तिचा प्रियकराने एक कुटुंब उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या वाठोडा परिसरातील साईंनाथ सोसायटीत समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव चंद्रसेन बालकृष्ण रामटेके (३८) असे असून, तो पूर्वी एका ट्रॅव्हल कंपनीत काम करत होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून तो लकव्यामुळे अंथरुणावर खिळलेला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी दिशा रामटेके (३०) आणि तीन लहान मुले राहत होती.
कर्तव्याची ओझी… आणि अनैतिक संबंधांची सुरुवात-
पती आजारी पडल्यावर संपूर्ण जबाबदारी दिशावर आली. तिने गहाण ठेवलेले दागिने आणि मेहनतीच्या जोरावर वॉटर प्लांट सुरू केला आणि स्वतः ड्रायव्हिंग शिकून पाण्याचे कॅन पुरवण्याचे काम हाती घेतले. या व्यवसायातूनच तिची ओळख जवळच्या वॉटर केन मेकॅनिक आसिफ राजा अन्सारी उर्फ राजा बाबू टायरवाला (२८) याच्याशी झाली. ही ओळख पुढे अनैतिक संबंधांमध्ये बदलली.
संशय, वाद आणि मग हत्या…
चंद्रसेनला या नात्याची कल्पना आली. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होऊ लागली. या वादांना संपवण्यासाठी दिशाने चक्क पतीच्या खुनाचा कट रचला.
संपूर्ण कटाप्रमाणे दिशा हिने आसिफला दुपारी घरी बोलावले. दुपारी ३ वाजता जेव्हा चंद्रसेन झोपेत होता, तेव्हा दोघांनी मिळून उशीने त्याचा गळा दाबून खून केला. नंतर आसिफ तिथून निघून गेला, तर दिशा दोन तास मृतदेह तसाच ठेवून बसली. नंतर तिने चंद्रसेनला मेडिकलला नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोस्टमार्टमने फोडले बिंग-
दिशाने सुरुवातीला पतीच्या नैसर्गिक मृत्यूचा बनाव केला. वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून तपास सुरू केला. मात्र पोस्टमार्टम अहवालात श्वास गुदमरण्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिशावर संशय घेत चौकशी केली असता, तिने खूनाची कबुली दिली. यानंतर प्रियकर आसिफलाही अटक करण्यात आली.
तीन निष्पाप लेकरांचा उद्वस्त संसार
या क्रूर घटनेचा सर्वात मोठा आघात त्या तीन लहानग्यांवर झाला. त्यांना एका क्षणात वडील गमवावे लागले आणि आई जेलमध्ये गेल्याचे पाहावे लागले. कुटुंबातील इतर सदस्य व परिसरातील लोकही या दु:खद घटनेने हादरले आहेत.
पोलिसांची कारवाई सुरू
वाठोडा पोलिसांनी दिशा आणि आसिफविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात त्यांना हजर करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या खूनामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपासही सुरू आहे.दिशा एक मेहनती महिला होती. पण गेल्या काही महिन्यांपासून तिच्यात काहीसा बदल दिसत होता. काहीतरी गडबड असल्याचा आम्हाला संशय होता.ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरती मर्यादित नाही, तर ती एका कुटुंबाच्या स्वप्नांचा आणि भविष्यातील आशेचा अंत दर्शवते. जेव्हा नात्यांमध्ये संवादाऐवजी संशय जागा घेतो, तेव्हा शेवट नेहमीच भयावह ठरतो.