Published On : Thu, Apr 20th, 2017

Nagpur: पतीनं पाठवला चक्क पोस्टानं तलाक, मुलगी झाल्याचं कारण देऊन दिला ‘तलाक’


नागपूर (Nagpur):
मुलगी झाली म्हणून टपालानं ‘तलाक’ दिल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. दुसरीही मुलगी झाली या कारणावरून हा तलाक दिला आहे. यामुळे महिलेला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात आता तिनं राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. एकीकडे ट्रिपल तलाकवरून देशभर चर्चा होत असताना रोज विविध प्रकारे तोंडी तलाक देण्याच्या घटना समोर येत आहे.

लोकमत ऑनलाइननं दिलेल्या वृत्तानुसार, मो. अकिल मो. इस्माईल शेख (36) हा व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील परतूर इथला रहिवाशी आहे. तो पोलीस दलात कार्यरत आहे. त्याचं या आधीच एक लग्न झालं असून त्यानं पहिल्या पत्नीला तलाक दिला आहे. त्यानंतर त्यानं 2013 मध्ये त्यानं दुसरा निकाह केला. दरम्यान दुसरी पत्नी गर्भवती होती. पण पतीला मूल नको होते त्यामुळे तिचा छळ करणं सुरू होतं. त्यातच तिला माहेरी सोडण्यात आलं. त्यानंतर तिनं एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून पतीनं तिला सासरी नेण्यास नकार दिला. मात्र माहेरच्या लोकांनी तिला सासरी नेऊन सोडले.

सासरी गेल्यावर तिचा छळ सुरूच होता. तिला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलीला सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जायचा. पती तिला कायम तलाक देण्याची धमकी द्यायचा. ती महिला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये परतूर येथे पतीसोबत आली. पण सात महिन्यांची गर्भवती असताना माहेरी सोडण्यात आले. त्यानंतर तिला दुसरी मुलगीच झाली. पण तीन महिने होऊनही पती काही तिला न्यायला घरी आला नाही. अखेर 11 एप्रिलला तिच्या पतीनं तिला टपालाद्वारे तलाक पाठविला. माझा कोणताही दोष नसताना व मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी तलाक पाठविण्यात आल्याची माहिती या महिलेनं दिली आहे.

पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. मला तलाक मंजूर नाही. मुलींचा उदरनिर्वाह करण्यासाठी साधन नसल्याने मला न्याय मिळावा, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.