नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का?: विखे पाटील

Vikhe Patil
नागपूर: विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर अद्याप चर्चा होणे बाकी असताना आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नसताना सरकार नागपूर अधिवेशन गुंडाळण्याची घाई का करत आहे, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत 22 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाचा समारोप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, नागपूर अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात यावा, अशी मागणी आम्ही 21 नोव्हेंबर 2017 रोजी केली होती. हे अधिवेशन विदर्भात होत असल्याने येथील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न या अधिवेशनात चर्चिले जाणे अपेक्षित आहे. परंतु, हे अधिवेशन दोन आठवड्यातच संपवले जाणार असल्याने विदर्भातील जनतेसह संपूर्ण राज्यातील अनेक समाजघटकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होईल, असेही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.