Published On : Thu, Aug 3rd, 2017

मोपलवारांचा न्याय प्रकाश मेहतांना का नाही?: विखे पाटील

Advertisement

392025-vikhe-patil
मुंबई:
भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपानंतर सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत करण्याचा न्याय राज्य सरकारने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना का लावला नाही, अशी संतप्त विचारणा करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मेहतांचा राजीनामा होईस्तोवर कामकाज न चालू देण्याचा इशारा दिला आहे.

मोपलवार यांना पदच्युत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सरकारने सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करण्याऐवजी केवळ पदावरून हटवल्याने त्यांचा सरकारवरील प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्या निलंबनाची विरोधकांची मागणी कायम आहे. मोपलवारांनी त्यांच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या सतीश मांगले नामक तरूणाच्या अख्ख्या कुटुंबाला वेठीस धरले आहे. बुधवारी सायंकाळी मांगले याने माझी भेट घेऊन त्याच्या संपूर्ण कुटुंबावर सुरू असलेल्या मोपलवारांच्या दडपशाहीची इत्यंभूत माहिती दिली. एका सनदी अधिकाऱ्याची इतकी मुजोरी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, अशी विचारणाही करून मांगले यांना सरकारने तातडीने संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारांना पदच्युत करणे भाग पडले आहे. पण् हाच न्याय सरकारने प्रकाश मेहता यांना का लावला नाही? एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपानंतर सरकारने चौकशी समिती नेमून त्यांचा राजीनामा घेतला होता. त्याच पद्धतीने गृहनिर्माण मंत्र्यांना पदावरून का हटवले जात नाही? असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

तत्पूर्वी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशीबाबत सरकारच्या उदासीन भूमिकेचे पुरावेच सादर केले. मोपलवारांविरूद्ध भाजपच्या आमदारांनी रितसर तक्रारी केल्या. सतीश मांगले यानेही पुरावे दिले. परंतु, त्यासंदर्भात सरकारने काहीच चौकशी केली नाही. ही वस्तुस्थिती असताना एक महिन्याच्या आत त्यांची चौकशी करण्याच्या सरकारच्या आश्वासनावर कसा विश्वास ठेवायचा? अशीही विचारणा त्यांनी केली.