नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असून उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात युद्ध पातळीवर प्रचाराला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग चौथ्यांदा लढून विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काँग्रेसने प्रफुल्ल गुडधेंच्या रूपाने आपला शिलेदार मैदनात उतरविला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये होणारी लढत चुरशीची ठरणार आहे.
नागपुरात या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजेच मागील तीन निवडणुकांपासून देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघातून निवडणूक लढवत असून विजयी होत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे समर्थन करणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांसाठी ही निवडणूक लढणे सोपे नाही. फडणवीसांना आपल्याच मतदारसंघात ताकद लावावी लागत आहे.
लोकसभेत मिळालेल्या फटक्यानंतर फडणवीस ॲक्शन मोडवर-
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हाच प्रकार घडू नये म्हणून फडणवीसांनी याकडे लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभेत भाजपाला कमी मते पडल्यानंतर फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारत आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे.पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचे, असे म्हटले होते. त्यानुसार ते कामाला लागले आहे.
काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच लागले होते प्रचाराला –
काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी देखीलनागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करण्यासाठी ते तयारीला लागले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या तयारीला आणि प्रचाराला प्रारंभ केला होता. मध्यंतरी ते हरियाणाच्या प्रचारार्थ होते. तेथून परतल्यानंतर ते संपूर्ण जोर लावून पदयात्रा, बैठका यांद्वारे जनसंपर्क करीत आहेत; अर्थात त्यांच्यापुढे असलेले फडणवीस यांचे आव्हानही मोठे आहे. यापूर्वी, म्हणजे २०१४ मध्ये हे दोघे एकमेकांविरोधात लढले होते. त्यात गुडधे पराभूत झाले होते. या वेळी उपमुख्यमंत्री विरुद्ध नगरसेवक अशी लढत होऊ नये म्हणून काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत पद देऊन निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.
दक्षिण-पश्चिम नागपुरातील मतदार फडणवीसांना भरघोस मतदान करणार का?
दक्षिण-पश्चिम नागपूर हा मिश्र स्वरूपाच्या मतदारसंघ असल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही वस्त्यांमध्ये नव्याने बांधलेल्या रस्त्यांमुळे घरे खाली गेली आहेत आणि पावसाळ्यात त्याचा फटका या मतदारसंघातील अनेक घरांना बसत आहे. याशिवाय मालकी हक्काच्या पट्ट्यांचा प्रश्न, जुन्या वस्त्यांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे नेटवर्क पुरेसे कार्यक्षम नसणे, अनियमित पाणीपुरवठा, शिवणगाव येथील पुनर्वसनाचे आणि सुविधांचे प्रश्न, तरुणांमधील बेरोजगारीचा मुद्दाही मोठ्या प्रमाणात उपस्थित करण्यात येत आहे. मागील तीन निवडणुकांपासून देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघातून निवडणूक लढवत असून विजयी होत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांच्या या समस्या ते सोडवू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. हे पाहता या मतदारसंघातील मतदार त्यांना भरघोस मतदान करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.