बीड: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे.
कराडवर आधीच खंडणीअंतर्गत गुन्हा दाखल होता. खंडणीविरोधात पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मग वाल्मिक कराडप्रकरणी ईडी आणि पीएमएलएने कारवाई का केली नाही , असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
खंडणीप्रकरणी कंपनीने मे महिन्यात नोटीस पाठवली होती. त्यामुळे वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असतानाही ईडीने कारवाई का केली नाही? असे म्हणत सुळे यांनी वाल्मिक कराडविरोधातील सर्व एफआयआरची प्रत माध्यमांना दाखवली.या गुन्ह्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवली नव्हती का? असा प्रश्नही सुळे यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला आहे. याप्रकरणी मी आणि खासदार बजरंग सोनावणे अर्थमंत्रालयाला पत्र लिहिणार आहोत.
महाराष्ट्रात गुंतवणूक येणार असतील आणि अशी खंडणी होणार असेल तर महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूकदारांनाही न्याय मिळणार नाही का? या प्रकरणात ईडी आणि पीएमएलएची कारवाई झाली नाही. संतोष देशमुखांची हत्या ही एक केस, आर्थिक फसवणुकीचा दुसरा गुन्हा. मग यात ईडी का गुंतली नाही? वाल्मिक कराडला सातत्याने विशेष ट्रिटमेंट का दिली जाते? मे महिन्यात जो गुन्हा दाखल झाला त्याविरोधात कारवाई झाली असती तर संतोष देशमुखांची हत्याच झाली नसती,असेही सुळे म्हणाल्या.