Published On : Sat, Aug 28th, 2021

बकरा मंडीतील करोडो रुपये महसूल बुडविणा-या दलालांना पुन्हा संधी कां?

Advertisement

नियम धाब्यावर ठेवून लायसन्सचे नुतनीकरण कसे?

आमदार कृष्णा खोपडे यांनी चौकशी अधिकारी खंडागळे यांचेसमक्ष ठेवला कच्चाचिठ्ठा

 

नागपूर : कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथे प्रशासक भुसारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झालेला असून याबाबत आमदार कृष्णा खोपडे यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मा.खडांगळे साहेब, पुणे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक शासनाने केलेली आहे. खंडागळे साहेब यांच्यासोबत जवळपास एक तास याबाबतीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान अनेक नवनवीन खुलासे आमदार कृष्णा खोपडे यांनी खंडागळे साहेब यांचेसमक्ष जाहीर केले. त्यावेळी खंडागळे यांनी यासंदर्भात सविस्तर चौकशी करून जुन्या -नवीन सर्व रेकॉर्डची तपासणी करून सविस्तर चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल, असे खंडागळे यांनी सांगितले.

सन 2002 ते 2020 पर्यंत फक्त 95 हजार महसूल,

इतके वर्ष नागपूरकरांनी मटन खाल्ले नाही कां?

 

आमदार कृष्णा खोपडे यांनी खंडागळे साहेबांना दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, नागपूर शहराच्या मोमिनपुरा भागात अंदाजे 50 वर्षापासून अवैधरीत्या सुरु असलेल्या बकरामंडी अधिका-यांच्या मिलीभगत मुळे इतक्या वर्षात शासनाचे महसूल फक्त 95,078/-रुपये इतकेच दर्शविण्यात आले आहे. इतक्या वर्षात विदर्भ व नागपूरच्या जनतेनी बकरा खाल्ला नाही कां? असा सवाल आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला.

कोरोनाच्या काळात म.न.पा.ने दि.05/07/2020 रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बकरामंडी कृषि उत्पन्न बाजार समिती, कळमना येथे स्थानांतरीत करण्यात आले.  आज बाजार समिती तर्फे आठवडयात तीन दिवस मार्केट भरते. तीन दिवसात अंदाजे 10 लाख रुपये महसूल शासनाला मिळतो. यावरून प्रशासकाच्या भ्रष्ट्राचारामुळे जवळपास 50 कोटीच्या वर महसूल बुडविल्याचे स्पष्ट दिसून येते.

इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल बुडविल्यानंतरही श्री.राजेश भुसारी यांनी दि.05/07/2020 मार्केट सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर या 51 लायसन्सधारकांचे मागील तारखेत सर्वांचे लायसन्स रिनीवल केले. शासनाच्या निर्णयाप्रमाणे दरवर्षी लायसन्स रिनीवल होतात. त्यावर असलेली संपूर्ण थकबाकी घेण्यात येते. परंतु या सर्व दलालांनी प्रशासकाचे आशीर्वाद घेऊन हे सर्व लायसन्सधारक रीनीवलला पात्र नसताना सुद्धा कसल्याही प्रकारची थकबाकी, दंडात्मक कारवाई, ब्लॅक लिस्ट व एफ.आय.आर. न करता आपला व्यवसाय पुन्हा सुरु केला. करोडो रुपयाचे महसूल बुडविण्यात या अधिका-यांनी साठगांठ केली. शासन सर्व गोष्टी माफ करू शकतो, परंतु शासनाचा महसूल बुडविणे हे कदाचित माफ करण्यायोग्य नाही.

बकरा मंडीचे निर्माण कार्य, नियमाच्या बाहेर जाऊन नोक-या देणे, गाळेवाटपाबाबत भ्रष्ट्राचार याची सुद्धा चौकशी व्हावी

बकरा मंडीचे निर्माणकार्य करताना कायद्याची मोडतोड व नियमाची पायमल्ली करून मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राट दिल्याची शंका असून नियमानुसार एकाच कामाचे टुकडे करून कंत्राट देता येत नाही. 3 लक्ष रुपयाच्या वर कामाची किमत असल्यास ई-निविदा ईअध्ल्य जातात. त्यामुळे शेडचे बांधकाम करणे, जमीन लेवलिंग करणे व अनेक अनेक विकासकामाचे 100 पेक्षाही जास्त टुकडे अंदाजे 5 कोटीची विकासकामे 3 लाखाच्या आत कशी बसविता येईल. याची वजा-बाकी करून कंत्राट देण्यात आले. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचे लक्षात येते. तसेच पात्र नसताना कर्मचा-याची नेमणूक, गाळेवाटप समितीच्या संचालक मंडळाच्या नातेवाईकांना देणे, सेस लंपास करण्यात मोठा भ्रष्ट्राचार असे अनेक लक्ष्मीदर्शनाचे प्रकार या कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये झाले आहे. शासनाने या सर्व बाबीवर चौकशीचे आदेश देऊन झालेला सर्व प्रकार जनतेसमोर उघडकीस आणावा. यासंदर्भात लवकरच मंत्री महोदयांना भेटून मागणी करण्यात येईल. असे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

अशा भ्रष्ट अधिका-यावर मंत्री महोदय मेहरबान कां?

भुसारी प्रशासक असताना अनेक प्रकारचे भ्रष्ट्राचार या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये झाल्याचे लक्षात येत आहे. या ठिकाणी असलेल्या संचालक मंडळासोबत संगनमत करून गालेवाटप व अन्य बाबतीत चौकशी अहवाल देखील सन 2017 साली शासनाकडे सादर झालेला आहे. या अहवालात अनेक प्रकरण उघडकीस आले आहे. शासनाने अशा भ्रष्ट अधिका-याची बदली न करता मंत्री महोदयांच्या शिफारसीवर पुन्हा एका वर्षाची मुदतवाढ दिली. त्यामुळे पुन्हा या अधिका-याच्या माध्यमातून काय प्रताप घडवून घ्यायचे आहेत, याबाबत शंका येते. या अधिका-याचा इतकाच पुळका येत असेल तर शासनातर्फे पुरस्कार जाहीर करून त्यांचा जाहीर सत्कार करावा. शासनाने निष्पक्ष चौकशी जर या ठिकाणीं केली, तर भ्रष्ट्राचार शिरोमणी म्हणून यांचा सत्कार नक्कीच करावा लागेल. नागपूर कृषि उत्पन्न बाजार समिती भ्रष्ट्राचाराचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होईल. असेही आमदार कृष्णा खोपडे यावेळी म्हणाले.

यावेळी खंडागळे साहेब यांचेसोबत अधिकारी संजय हिवसे, मटन दुकानदार संघातर्फे बालू रारोकर, शैलेश पारधी, अब्दुल रज्जाक कुरेशी, नितीन लारोकर, विजय फुलसुंगे, आशु मदने, विनोद लारोकर, रॉकी लारोकर, विशाल कटारे, मंगेश दुर्गे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.