मुंबई :महायुतीची बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुती सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. तसेच यावेळी फडणवीस यांनी शरद पवारांना मोठे आव्हान दिले.
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुनही जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी महायुतीने आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा मग आम्ही करु असे म्हटले होते. त्यावर आता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.
सत्तापक्षाला मुख्यमंत्री पदाची चिंता नाही. कारण इथे स्वतः मुख्यमंत्री बसले आहेत. त्यांना विचारा तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगाएकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगा. मी शरद पवारांना आव्हान करतो की तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण एवढं सांगा,असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचे कुणाला डोहाळे लागलेले नाहीत.आमचे सव्वा दोन वर्षाचे काम हाच आमचा चेहरा आहे. त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा ठरवावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.