Published On : Sat, May 11th, 2019

अतिसार रोखण्यासाठी असलेल्या रोटा व्हायरस लसीचा नियमित लसीकरणात समावेश

नागपूर: बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद सर्वेलन्स, कुटुंब कल्याण प्रशिक्षण पथक प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार, डॉ. असीम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर म्हणाले, ‘रोटा व्हायरस’ हा विषाणू मुलांमधील अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे. ‘रोटा व्हायरस’ संसर्गाचा आरंभ सौम्य अतिसाराने होऊन तो पुढे जाऊन गंभीर स्वरुप धारण करु शकतो. तसेच पुरेसा उपचार न मिळाल्यास शरीरांमध्ये पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन प्रसंगी बालकाचा मृत्यू देखील ओढावू शकतो. यासाठी ही लस मुलांना अनुक्रमे दीड, अडीच व साडेतीन महिन्यांपर्यंत तीन वेळा तोंडावाटे द्यावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Advertisement

ही लस सुरक्षित आहे. लस दिल्यानंतर सौम्य आणि तात्पुरती लक्षणे जसे उलटी, अतिसार, खोकला, सर्दी, चिडचिड, भुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. कुपोषित मुलांवर त्वरित उपचार न झाल्यास अतिसार गंभीर स्वरुप धारण करु शकतो. यासाठी ‘रोटा व्हायरस’ लसीकरण बालकांमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे, असे कुटुंब कल्याण प्रशिक्षण पथक प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार म्हणाले.

लसीकरणाबाबत माहिती देतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद सर्वेलन्स म्हणाले, भारतामध्ये जी मुले अतिसारामुळे रुग्णालयात भरती होतात, त्यापैकी40 टक्के मुले रोटा व्हायरस संक्रमणाने ग्रस्त असतात. देशात 78 हजार मुलांचा यामुळे मृत्यू होतो. त्यापैकी 59 हजार बालमृत्यू मुलांच्या पहिल्या दोन वर्षामध्ये होतो.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांच्या हस्ते रोटा व्हायरस या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यशाळेला वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन आणि आभार जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्रीमती सुरेखा चौबे यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement