Published On : Mon, Jun 4th, 2018

शिवसेना सोबत असो किंवा नसो तरी आम्ही जिंकू शकतो : मुख्यमंत्री

Devendra
मुंबई: शिवसेना सोबत असो किंवा नसो तरी आम्ही जिंकू शकतो, हे पालघरमध्ये मिळालेल्या यशावरून सिद्ध झाले आहे, त्यामुळे आता आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत आज भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

आगामी निवडणुकांची रणनिती ठरवण्याच्या दृष्टीने झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मागील निवडणुकीबाबत भाष्य केले. यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करताना मुख्यमंत्री म्हणाले, पालघरची निवडणूक जर शिवसेनेशिवाय लढवण्यात आली तर, ती पक्षाला कठीण जाईल, असे मानले जात होते. मात्र, पालघरचा निकाल पाहता आता तसे होणार नाही. त्यामुळे शिवसेना सोबत असो किंवा नसो आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सुचना त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, शिवसेनेने एकत्र यावं, असं आवाहन केलं. समविचारी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. युती एका बाजूने होत नाही, ती दोन्ही बाजूने व्हायला हवी. पालघरच्या निवडणुकीने आमची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. तरीही शिवसेनेसोबत जाण्याची आमची इच्छा आहे. मात्र, सेनेकडून प्रतिसाद मिळाला तर ठीक नाही तर आम्ही निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत, अशा शब्दांत दानवे यांनी अप्रत्यक्षरित्या युती तुटल्याचेच जाहीर केल्याचे बोलले जात आहे.