Published On : Thu, Jul 22nd, 2021

गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ……

Advertisement

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. ज्याप्रमाणे जलाशयात पाणी विपुल असते. परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरुजवळ शिक्ष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. “गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ” हेच खरे आहे.

गुरु हा शब्द संस्कृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने वापरला जातो. पोर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु साधकाचे अज्ञान दुर करतो आणि त्याच्या आत असलेल्या निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो म्हणून गुरुपोर्णिमा ही सदगुरुची पोर्णिमा मानली जाते. योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपोर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो. गुरु पोर्णिमेच्या दिवशी पारंपारिकरित्या साधक त्यांच्या गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. आणि त्यांचे आर्शिवाद प्राप्त करतात. अंध:काराचा नाश करुन ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरु असतो. जो सकल जीवास चांगले शिकवितो. संस्कार देतो तो गुरु.

आषाढातील शुल्क पक्ष पोर्णिमेला गुरुपोर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठया श्रध्देने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असतांना भावपूर्ण श्रध्देने गुरुपूजा करुन गुरु दक्षिणा दयायचे.

चारही वेंदावर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. त्यामुळे गुरुपोर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरुला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा करतो.

भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोडया प्रसिध्द आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण-सुदामा, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

भारतीय संस्कृतीने गुरुंना नेहमीच पुजनीय मानले आहे. आई ही सर्वात पहिली गुरु असते. ती आपल्या मुलांना योग्य संस्कार देते, योग्य मनुष्य बनण्यास मदत करते. म्हणतात ना…‘आई माझा गुरु… आई कल्पतरु’ नंतर शालेय शिक्षक असतात परंतु मनुष्याकरिता आणखी एक महत्वाचा गुरु असतो तो म्हणजे निसर्ग. आपण सर्वांनी आपल्या या सर्व गुरुंचा सन्मान केला पाहिजे.

गुरुंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरुन येते तेव्हा आपल्या तोडून श्लोक बाहेर पडतो.

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: