Published On : Fri, Aug 23rd, 2019

फडणवीस कधी देणार पीक विमा… कधी देणार हमीभाव… कशाला शेतकर्‍यांना फसवताय- अजित पवार

Advertisement

परभणी: पाथरी दि. २३ ऑगस्ट – हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने पीक विमा मिळत नाहीय…फडणवीस कधी देणार हमीभाव… कशाला शेतकर्‍यांना फसवताय…असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पाथरीच्या जाहीर सभेत सरकारला केला.

मराठवाडयाला पाच वर्षांत शेतीसाठी या सरकारकडून काय मिळाले असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.

आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्य होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं असेही अजितदादा पवार म्हणाले.

लोकसभेत दगाफटका झाला… पाथरीने चांगलं काम केलं त्याबद्दल जाहीर आभार परंतु आतातरी ताक फुंकुन प्या… सावध रहा… उद्याची पहाट तुमची आहे… योग्य सल्ला, दिशा देवू… यातून समाज पुढे गेला पाहिजे.

आमचं सरकार निवडून आणा चार महिन्यात तुमचा सातबारा कोरा करून दाखवतो नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही असे जबरदस्त आवाहन अजितदादा पवार यांनी जनतेला केले.

*यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार आहेत अशी माहिती अजितदादा पवार यांनी जाहीर सभेत दिली.*

घटनेने आम्हाला अधिकार दिलाय आणि तुम्ही आमची मुस्कटदाबी का करताय असा सवालही अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

पाच वर्षांत ‘त्या’ बॅंकेत कमिटीच्या मिटींगला गेलो नाही. माझा यत्किंचितही संबंध नाही. निवडणूक सुरु झाली की आलेच आदेश, नोटीस… असा टोला लगावतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली. कायदा सर्वांना समान हवा परंतु ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे हे योग्य नाही.

१८ रुपये पीक विमा चे पैसे शेतकरी ला दिले आहेत पीक विमा कंपन्या गडगंज झाल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत बटण दाबताना शंभरवेळा विचार करा व आघाडीची सत्ता आणा असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

*पुढेही मीच ‘चालू मुख्यमंत्री’ राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश – धनंजय मुंडे*

आत्ताही मी चालू मुख्यमंत्री आहे आणि पुढेही मीच चालू मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री काढत आहेत अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाथरी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांवर केली.

सत्तेत आल्यावर लगेच कर्जमाफी करतो असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते परंतु ही फसवी योजना निघाली आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. फसवी कर्जमाफी जाहीर करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्या घरात फूट पाडणारा अनाजी पंत होता आणि आताही दोन छत्रपतींचा घरात फुट कुणी पाडली तर फडणवीस असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

*प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने सरकारने पुसलीय – खासदार डॉ. अमोल कोल्हे*

प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करतंय.त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेचं काहीही देणेघेणे नाही असा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाथरीच्या जाहीर सभेत केला.

१६ हजार भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसले गेले आहे मग मुख्यमंत्री कुणावर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

कामंच केली नाही म्हणून महाजनादेश यात्रेत पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे असा टोला डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला.

मुख्यमंत्री एमबीए आहेत. त्यांच्या पदवीचा आदर करुन सांगतो आज ती पदवी म्हणजे ‘महाबोलबच्चन यात्रा’ झाली आहे अशी जोरदार टीकाही डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

आज आपण सुपात आहोत उद्या मंदीमुळे जात्यात जाणार आहोत हे लक्षात घ्या असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

सरकारच्या विरोधात कोण बोलायला कोण लागलं की लगेच सीबीआय, ईडीचा घडीबुवा अंगावर सोडला जातोय. सध्या हुकुमशाही सुरु आहे हे लक्षात घ्या असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

या सभेत आमदार बाबाजानी दुर्राणी, अमोल मेटकरी यांनी आपले विचार मांडले.

मानवतपासून पाथरीपर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रेतील पहिली सभा आज परभणीतील पाथरी येथून सुरु झाली.

पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि नवीन इमारतीचे उद्घाटन विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले.

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा पाचवा दिवस असून परभणी जिल्हयातील पाथरी येथे पहिली भव्य सभा पार पडली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार विजय भांबळे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, राजेश वीटेकर,माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी खासदार सुरेश जाधव,जिल्हा परिषद उपाध्यक्षा भावना नखाते, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.