नागपूर : महायुती सरकारने सत्तेत असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली. याअंतर्गत महिलांना १५०० रुपये महिना दिला जात होता.
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्यात येणार असे जाहीर करण्यात आले होते. आता महिलांना वाढीव २१०० रुपये ही रक्कम कधी मिळणार? असा प्रश्न पडला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.
लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली, त्यामुळे राज्याची आर्थिक ताकद वाढली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 देणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. विरोधकांनी सुधरावे , आम्ही जे बोललो ते बोललो, काँग्रेसने देखील आश्वासन दिली होती, मात्र त्यांनी ती पाळली नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र तरी देखील 2100 रुपये कधी मिळणार? याकडे आता राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी याच मुद्द्यावर बोलताना सर्व सोंगं करता येतात परंतु पैशांचं सोंग करता येत नाही. राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की योग्यवेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती.