मुंबई : यंदा दिवाळीचा मुख्य सण नेमका कोणत्या दिवशी साजरा करायचा — २० की २१ ऑक्टोबर — यावर सध्या भक्तांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. काही पंचांगांनुसार लक्ष्मीपूजन २० ऑक्टोबर रोजी तर काहींनुसार २१ ऑक्टोबर रोजी करण्याची नोंद आहे. मात्र, काशी विद्वत परिषदेने या गोंधळावर पूर्णविराम देत स्पष्ट भूमिका घेतली आहे.
परिषदेने धर्मशास्त्र आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या उपस्थितीत घेतलेल्या चर्चेनंतर जाहीर केलं की, २० ऑक्टोबर २०२५ (सोमवार) या दिवशीच प्रदोषकाळ व्यापिनी अमावस्या तिथी लागू होत असल्याने याच दिवशी लक्ष्मीपूजन करावं, असा शास्त्रीय निर्णय घेण्यात आला आहे.
तिथी आणि गणनापद्धतीनुसार निर्णय-
काशीतील धर्मशास्त्र व ज्योतिष प्राध्यापकांनी विविध पंचांगांच्या गणना तपासून हा निष्कर्ष काढला. प्रदोषकाळात येणारी अमावस्या केवळ २० ऑक्टोबरलाच प्राप्त होत असून २१ ऑक्टोबरला वृद्धिगामिनी प्रतिपदा सुरू होत असल्याने त्या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळ उपलब्ध नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मागील वर्षासारखाच गोंधळ-
२०२४ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. काही पंचांगांतील लहान फरकांमुळे देशभरात वेगवेगळ्या तारखा सांगितल्या गेल्या होत्या. मात्र, काशी विद्वत परिषदेच्या निर्णयानुसार अखेर संपूर्ण देशभर दिवाळी एकाच दिवशी साजरी करण्यात आली होती.
२०२५ साली दिवाळीचा शुभ मुहूर्त-
द्रिक पंचांगानुसार —
- अमावस्या तिथीची सुरुवात: २० ऑक्टोबर दुपारी ३.४४ वाजता
- अमावस्या तिथीची समाप्ती: २१ ऑक्टोबर रात्री ९.०३ वाजता
- लक्ष्मीपूजनाचा सर्वोत्तम मुहूर्त: संध्याकाळी ७.०८ ते ८.१८
हा मुहूर्त प्रदोषकाळ व स्थिर लग्नाच्या संयोगात येत असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.
काशी विद्वत परिषदेचं आवाहन-
सर्व श्रद्धाळूंनी २० ऑक्टोबर २०२५ रोजीच दिवाळी आणि लक्ष्मीपूजन साजरं करावं, असं काशी विद्वत परिषदेचं आवाहन आहे. शास्त्रसिद्ध गणनांनुसार हाच दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि नवसंपत्तीच्या आराधनेसाठी सर्वाधिक मंगल आहे.