नवी दिल्ली: भारतात आणि जगभरात दिवाळीचा सण रंगतदार उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांतवरील शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत खास दिवाळी उत्सवात सहभाग घेतला.
यावेळी पंतप्रधानांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे शौर्य व पराक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, “आयएनएस विक्रांतच्या नावाने पाकिस्तानचं मनोबलच कमी होतं. या नौकेमुळे शत्रू आधीच सावध होतो. हीच खरी ताकद आहे आयएनएस विक्रांतची. आपल्या सशस्त्र दलाला मी खास सलाम करतो.”
मोदी म्हणाले, “आजचा अनुभव अत्यंत अद्भुत आहे. समुद्राच्या विशालतेत आणि भारतीय सैनिकांच्या अपार सामर्थ्यात मी विस्मयचकित झालो आहे. रात्री आयएनएस विक्रांतवर घालवलेला वेळ अविस्मरणीय होता. जवानांनी आपल्या गाण्यांत ऑपरेशन सिंदूरच्या कथा इतक्या भावपूर्ण पद्धतीने मांडल्या की शब्द अपुरे पडतात.”
ते पुढे म्हणाले, “दिवाळी हा सण कुटुंबासोबत साजरा करण्याचा असतो. मला माझ्या कुटुंबासोबत हा सण साजरा करण्याची सवय आहे. आज मी माझ्या दुसऱ्या कुटुंबासोबत — म्हणजे जवानांसोबत — हा आनंद साजरा करत आहे.”
पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतबद्दल बोलताना म्हटले, “जेव्हा विक्रांत देशाच्या सेवेत आणला जात होता, तेव्हा मी त्याची भव्यता पाहून मंत्रमुग्ध झालो. विक्रांत केवळ एक युद्धनौका नाही; ती २१ व्या शतकातील भारताच्या मेहनत, प्रतिभा, धैर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे.”