
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे सभेसाठी जात असलेल्या त्यांच्या विमानाचा विमानतळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्व प्रवासी जागीच ठार झाले. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांना मोठा धक्का बसला असून, हजारो डोळे अश्रूंनी भरले आहेत. अशा वेळी चार दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या भाषणातील एक वाक्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
२४ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, हे जग कायमस्वरूपी नाही. आज आपण आहोत, उद्या नसूही शकतो. काळ आणि नियती जेव्हा हाक देतील, तेव्हा प्रत्येकालाच जायचं असतं. मात्र, काम करताना राजकारणालाच सर्वस्व मानू नये, निवडणुका संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या हिताचे, विकासाचे काम झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
याच भाषणात त्यांनी जनतेच्या प्रेमाचा उल्लेख करताना सांगितले होते की, लोकांचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. याच बळावर मी सातत्याने काम करत आहे. निवडणुकीच्या काळातील आपल्या धावपळीचा उल्लेख करत त्यांनी एका दिवसात सांगली, लातूर, परभणी, अमरावती आणि नागपूर असा दौरा करून रात्री पुण्यात मुक्काम करत असल्याचेही सांगितले होते.
आज त्यांचे हेच शब्द आठवताना अनेकांच्या मनात हळहळ दाटून येत असून, नियतीच्या खेळापुढे माणूस किती असहाय्य असतो, याची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे.








