
बोगोटा : महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच जगभरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबियामध्ये लहान प्रवासी विमान कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक विद्यमान खासदार आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराचा समावेश आहे.
व्हेनेझुएलाच्या सीमेलगत विमान लँडिंगसाठी येत असताना हा अपघात झाला. नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे ट्विन-प्रोपेलर बीचकाफ्ट 1900 प्रकारचे विमान होते. सरकारी विमान कंपनी सतेनाद्वारे चालवले जाणारे हे विमान एका खासगी कंपनीकडून भाड्याने घेण्यात आले होते.
अवघ्या 23 मिनिटांत सगळं संपलं-
हे विमान कोलंबियाच्या सीमावर्ती कुकुटा शहरातून काल दुपारी उड्डाणासाठी निघाले होते. ओकाना येथे उतरण्यापूर्वीच विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानात 13 प्रवासी आणि दोन कर्मचारी होते.अवघ्या 23 मिनिटांचा प्रवास असलेले हे उड्डाण मृत्यूदायी ठरले. विमान अपघातात कोणीही वाचले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दुर्घटनेचं कारण अद्याप गुलदस्त्यात-
अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोलंबियन सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, हवाई दलामार्फत शोध आणि बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे.
विमानाचे अवशेष अँडीज पर्वतरांगांच्या पूर्व भागात सापडले आहेत. हा भाग खडकाळ, घनदाट जंगलांनी वेढलेला असून हवामानातील सततच्या बदलांमुळे मदतकार्याला अडथळे येत आहेत. याशिवाय, हा परिसर नॅशनल लिबरेशन आर्मी (ELN) या सशस्त्र संघटनेच्या प्रभावाखाली असल्याचंही सांगण्यात येत आहे.
खासदाराचा मृत्यू, राजकीय क्षेत्रात शोककळा-
आतापर्यंत सात मृतदेह सापडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उत्तर सँटँडर प्रांताचे गव्हर्नर विल्यम विलामिझर यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या विमानात एक कोलंबियन खासदार आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रवास करत होते.
या दुर्घटनेत कोलंबियाच्या चेंबर ऑफ डेप्युटीजचे 36 वर्षीय खासदार डायोजेनेस क्विंटेरो आणि निवडणूक उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.








