Published On : Thu, Oct 17th, 2019

दिव्यांगासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सुविधा

Advertisement

नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हयातील विधानसभा निहाय प्रत्येक मतदान केंद्र इमारतीच्या परीसरात व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी 1 हजार 540 व्हीलचेअर सज्ज झाल्या आहेत. दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी लाईनमध्ये न लागता मतदान केंद्रात जावून आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

दिव्यांग मतदारांना सूलभपणे मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांग मतदार म्हणून नोंद असलेल्या जिल्हयातील 12 हजार 87 नोंद करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना नाव आणि मतदान बूथ शोधण्यासाठी एसएमएस आधारित सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

तसेच दिव्यांगांना मदतीसाठी 1 हजार 710 व्हॉलेंटीअरची मतदारसंघ निहाय नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 340 विशेष शाळा शिक्षक व 14 ते 18 वयोगटातील राष्ट्रीय सेवा योजनेचे 1 हजार 370 विद्यार्थी सहाय्य करणार आहे. अपंगांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या व्हीलचेअर पैकी 610 व्हीलचेअर नागपूर शहरात तसेच 930 व्हीलचेअर ग्रामीण विभागात सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.