Published On : Wed, May 3rd, 2017

शिफू सनकृतीचा संस्थापक सुनिल कुलकर्णीशी राज्य सरकारचा काय संबंध आहे ? ते स्पष्ट कराः सचिन सावंत

sunil kaulkarni
मुंबई:
शिफू सनकृतीचा संस्थापक सुनिल कुलकर्णी हा मानवी तस्करी, मुलींना फसवणे आणि आर्थिक फसवणूक करणे इत्यादी आरोपाखाली सध्या तुरुंगात आहे. या आरोपीच्या सोशल मिडीया अकाऊंटवर झळकत असलेल्या फोटोवरून तो राज्य शासनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. समाज माध्यमावर उपलब्ध असणा-या सदर फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन प्रतिमा आणि राजमुद्रेसह महाराष्ट्र सरकार असे शब्द दिसत आहेत. यावरून सदरचा कार्यक्रम शासकीय अथवा भाजप प्रणित असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुनिल कुलकर्णीवर मुंबईसह दिल्ली आणि नागपूरातही आर्थिक फसवणूक, मानवी तस्करी, बलात्कार असे गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत. असे गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला शासनाच्या किंवा मुख्यमंत्र्यांशी संबंधित कार्यक्रमात बोलावले जात असेल तर त्याचे गांभीर्य अधिक होते. त्यामुळे शासनाचा सदर आरोपीशी कोणता संबंध होता. हे पारदर्शक सरकारकडून कळणे अभिप्रेत आहे, असा टोला लगावत सरकारने तात्काळ याची माहिती उघड करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.