Published On : Mon, Feb 19th, 2018

पाहा व्हिडिओ- मुख्यमंत्री-मंत्री पळाले, किल्ले शिवनेरीवर नेमकं काय घडलं?

Advertisement

शिवनेरी किल्ल्यावर आज जल्लोष होता. मात्र हा जल्लोष सुरु असताना शिवप्रेमींमधला सरकारविरोधातला असंतोष बाहेर पडल्याचं पहायला मिळालं. शिवप्रेमींनी घोषणाबाजी केल्यानं मंत्र्यांना चक्क पळ काढावा लागला. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दरवर्षी शिवजयंती झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण होत असतं. यंदा मात्र मुख्यमंत्र्यांनी भाषण केलंच नाही. पाळणा जोजवला आणि मुख्यमंत्री निघून गेले. शिवनेरीवर होणाऱ्या गोंधळाची मुख्यमंत्र्यांना पूर्वकल्पना असावी, त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री गेल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींच्या रोषाला तोंड देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला. तावडे काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता.

गोंधळ वाढत गेला त्यामुळे विनोद तावडे यांनी मागच्या मागे काढता पाय घेतला. ते पाहून पंकजा मुंडेही त्या ठिकाणावरुन निघून गेल्या. मंत्र्यांनी काढता पाय घेतल्याचं पाहून शिवप्रेमींचा संताप आणखी अनावर झाला. त्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’चा जयजयकार केला आणि सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन शिवप्रेमी आक्रमक झाले होते, असं कळतंय. त्यातच शिवप्रेमींनी गोंधळ घालू नये यासाठी सकाळी 4 वाजल्यापासून त्यांना गडाच्या पायथ्याशी रोखून धरण्यात आलं होतं, अशीही माहीती आहे. व्हिडिओमध्ये एक संतप्त तरुण पंकजा मुंडे यांना यासंदर्भात प्रश्न विचारत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, मुख्यमंत्री लवकर निघून गेल्याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम सुर आहे. त्यामुळे त्यांना जास्त वेळ शिवसेनेरीवर थांबता आलं नाही. राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्याचं महत्त्वाचं काम या कार्यक्रमाद्वारे होत आहे. तरीही मुख्यमंत्री महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने शिवनेरीवर आले, असं विनोद तावडे यांनी म्हटलंय.

पाहा व्हिडिओ-