छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, रखडलेली आर्थिक मदत, पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देऊन नेमका काय फायदा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकार शासकीय कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नाही. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने मध्यम मार्ग काढून शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, ‘तुम्ही विमानातून फिरा, गाडीतून फिरा; पण शेतकऱ्यांचे हाल तरी पाहा. त्यांची परिस्थिती तुम्हाला दिसत नाही का?’ असा सवाल ठाकरेंनी केला.
पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मागील वर्षाचा पीक विमाही अद्याप मिळालेला नाही. शेतमालाला योग्य भाव कोण देणार आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीचे पुढे काय झाले, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी दीपोत्सव रद्द करण्याच्या निर्णयावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केले. मोठे कार्यक्रम कमी केले जात असताना जनतेमध्ये संवेदनशीलता दिसते; मात्र सरकारमध्ये ती दिसत नसल्याची टीका त्यांनी केली.
दिया मिर्झा यांच्या फटाक्यांबाबतच्या व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर आरोप केला. फटाके न फोडण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेने कलाकारांना पत्र लिहिले होते, असा दावा त्यांनी केला. प्रदूषणाचा त्रास सर्व धर्मांच्या नागरिकांना होतो. मात्र दिया मिर्झा यांना त्यांच्या आडनावावरून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणासाठी आवाज उठवणाऱ्यांना अर्बन नक्षल किंवा देशविरोधी ठरवले जात असेल, तर जंगल वाचवण्यासाठी लढणाऱ्यांनाही असेच ठरवणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्याशी संबंधित प्रकरणावर बोलताना, या प्रकरणाचा व्हिडिओ अद्याप पाहिलेला नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. व्हिडिओ पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबईतील शिक्षकांना मारहाण झाल्याच्या कथित व्हिडिओचाही उल्लेख करत दोन्ही प्रकरणांची दखल घेण्याची भूमिका त्यांनी मांडली.
गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. गेल्या काही वर्षांत भाजपने विविध विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण केले असून आता सहकार क्षेत्रातही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीतील फुटीचा संदर्भ देत त्यांनी भाजपच्या राजकारणावर टीका केली.
मुंबई बस डेपो प्रकरणावर मात्र आदित्य ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली. हा विषय खासगी विकासक आणि मुंबई महापालिका यांच्यातील वाद असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगत, सविस्तर माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पदावरून हटवण्याची मागणी केली. मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच अशा गैरप्रकारांना मदत करणाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनादरम्यान तरुण आणि महिलांवर झालेल्या कथित अत्याचारांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
ऊसदरासाठी शेतकरी संघटनांना आंदोलन करावे लागत असल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. उत्तर प्रदेशात निवडणुका जवळ आल्याने ऊसदर वाढवण्याच्या हालचाली सुरू होतात; मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार कधी लक्ष देणार, असा सवाल त्यांनी केला.
हिंगोलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्रद्वेष आणि भ्रष्टाचार मान्य असलेले लोकच त्या गटात जात असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत राज्यात सत्तापरिवर्तन होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, ‘आमचं ट्रम्प कार्ड म्हणजे जनता,’ असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले. विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून त्यांनी राज्य सरकारसह भाजपला लक्ष्य केले.




