Published On : Thu, Sep 3rd, 2020

गांधी-लोहिया विचारांचा चिंतक निमाला, हरीश अड्याळकर यांचे निधन

Advertisement

नागपूर : राम मनोहर लोहिया आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे चिंतक, अभ्यासक, कामगार नेते हरीश अड्याळकर यांचे गुरुवारी कोरोनाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी केंद्रीयमंत्री स्व. जॉर्ज फर्नांडिस यांचे सच्चे ‘साथी’ होते.

एक आठवड्यापासून बरे वाटत नसल्याने त्यांना मेडिकलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आढळले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. बुधवारी प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले. मात्र, गुरुवारी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. यातच त्यांचे सायंकाळच्या सुमारास निधन झाले.

ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर अत्यंत पगडा होता. लोहिया यांची गोळीबार चौकात सभा आयोजित केली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी अड्याळकर उत्सुकता म्हणून या सभेला गेले होते. त्यांचे विचार ऐकून अड्याळकर यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तेव्हापासून त्यांनी लोहिया यांच्या विचाराला वाहून घेतले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपली विचारसरणी सोडली नाही. त्यांनी लोहिया अध्ययन केंद्र स्थापन केले होते. ‘सामान्य जन संदेश पत्रिकेच्या‘ माध्यमातून त्यांनी समाजवादी विचार पेरले. लोहिया यांच्यासोबतच महात्मा गांधी यांच्याही विचारांचा त्यांच्यावर पगडा होता.

दीड वर्षे होते भूमिगत

हरीश अड्याळकर रेल्वे कर्मचारी होते. १९७४ साली तत्कालीन रेल्वे कामगारांचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वात देशव्यापी संप झाला. त्यात ते सहभाही झाले होते. पोलिसांचा गोळीबार आणि लाठीमारामुळे संप चांगलाच चिघळला होता. विदर्भातील संपाची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. पोलिसांनी अटक करण्यासाठी त्यांची शोधाशोध केली. सुमारे दीड वर्षे ते भूमिगत होते. त्यामुळे त्यांना रेल्वेने निलंबितही केले होते.

अन् नोकरी पुन्हा बहाल

कालांतराने जॉर्ज फर्नांडिस रेल्वे खात्याचे मंत्री झाले. हरीश अड्याळकर यांना पुन्हा नोकरी बहाल करण्यात आली. निवृत्तीनंतर अड्याळकर यांनी आपले उर्वरित सर्व आयुष्य गांधी आणि लोहिया यांचे विचार पेरण्यासाठी लोहिया अध्ययन केंद्रातच व्यतीत केले. जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी त्यांचे फारच सख्य होते. ते जेव्हा जेव्हा नागपूरला यायचे ते लोहिया अध्ययन केंद्रात हमखास जायचे आणि हरीश अड्याळकर यांची भेट घ्यायचे.

रेल्वे कामगारांची श्रद्धांजली

आयुष्यभर रेल्वे कामगारांसाठी झटणारे अड्याळकर यांना रेल्वे कामगारांच्या सर्व संघटना व सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.