सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : पालकमंत्री बावनकुळे

नागपूर: रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून सर्वांनी या निकालाचे स्वागत करावे. एक ऐतिहासिक निर्णय म्हणून या निर्णयाची नोंद होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

लोकांच्या आस्थेला न्याय देणारा आणि विधिसंमत असलेल्या या निर्णयामुळे वादग्रस्त जमीन रामजन्मभूमीच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शांततेने स्वीकारला पाहिजे. अनेक जाती धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने राहतात याचा परिचय लोकांनी द्यावा. कोणत्याही जय-पराजयाचा हा निर्णय नाही, हे लक्षात ठेवून सर्वांनी शांतता बाळगावी असे आवाहनही पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.