मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर केलेल्या उपोषणातून मिळालेल्या मोठ्या यशानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. विजयाची घोषणा करताना त्यांनी मराठा समाजाला शांतता व संयम पाळण्याचं आवाहन केलं. जरांगे पाटील म्हणाले की, या लढ्याचं श्रेय त्यांच्या नावावर न जाता संपूर्ण समाजाच्या नावावर जावं. गरीब मराठ्यांनी आपलं जीवन पणाला लावून ही लढाई जिंकली असून अनेक शतकांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, १८८१ सालापासून सरकारने मराठ्यांसाठी कोणतीही ठोस तरतूद केली नव्हती. स्वातंत्र्यानंतरही गॅझेटियरमध्ये मराठ्यांचा उल्लेख आढळत नव्हता. त्यामुळे सरकारने काढलेला जीआर हा ऐतिहासिक टप्पा असून तो मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. ज्यांच्याकडे कागदपत्रांची कमतरता आहे, त्यांच्यासाठी गॅझेटियरचा आधार ठरेल.
समाजात कुठलाही गोंधळ किंवा अस्वस्थता निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी इशारा देत सांगितलं की, काहीजण अफवा व नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करतील. मात्र समाजाने अशा प्रवृत्तींना डावलून एकजूट टिकवणं गरजेचं आहे.आपल्या भाषणात त्यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांवरही टीका केली.
निर्णय घेताना ते एकटे नसून त्यांच्या पाठीशी सात कोटी जनता उभी असल्याचं ते म्हणाले. काहींचं राजकारण हातातून गेल्याने त्यांच्या नाराजीचा सूर उमटतो आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं की, मराठा समाजाचं भविष्य कोणत्याही नकारात्मक शक्तींवर अवलंबून राहणार नाही. समाजाच्या हितासाठी प्रत्येक पाऊल निर्धाराने उचललं जाईल.