Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 18th, 2019

  प्रत्येक योजनेत अपयश आलेल्या लोकांना पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आम्ही करणार नाही-शरद पवार

  शरद पवारांच्या महाराष्ट्र दौर्‍याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद…

  बीड : कारखानदारी बंद… शेतकरी संकटात आलाय… बेरोजगारी वाढत आहे… तरी हे राज्यकर्ते मत मागण्यासाठी येत आहेत. यांनी राज्यात आणलेल्या प्रत्येक योजनेत अपयश आले अशा लोकांना पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आम्ही करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीड येथील जाहीर सभेत दिला.

  निवडणूकीच्या आधी राज्यातील जनतेला भेटण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. आज नवी पिढी आणि शेतकरी वर्ग मला अस्वस्थ दिसतोय. ज्यांच्या हाती आपण सत्ता दिली त्यांनी शेतकऱ्यांची आणि तरुणांची दिशाभूल केली आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला.

  राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आकडा समोर आलाय. शेतकऱ्यांनी कर्ज काढले पण त्यात सवलती मिळाल्या नाही. शेतकऱ्यांच्या अब्रूचा पंचनामा होत आहे. कुठे मुलीच्या लग्नात अडचण तर कुठे मुलांच्या अर्ध्या शिक्षणाची व्यथा सुरु आहे असेही शरद पवार म्हणाले.

  संसदेत दर दोन वर्षांनी कर्जमाफीची आकडेवारी सादर केली जाते. यात व्यावसायिकांचे ८६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली मात्र यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही. मी मुख्यमंत्री असताना तब्बल ७१ हजार कोटीची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती असेही शरद पवार यांनी सांगितले.

  आम्ही सत्तेत असताना शिक्षणावर जास्त भर दिला. आज पाहिले असता देशात तसेच राज्यात शिक्षित मोठ्याप्रमाणावर आहेत. मात्र नोकरीच मिळेनाशी झाली आहे. नोकरीचे प्रमाण कमी तर अर्जदाराचे प्रमाण वाढत आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक कारखाने असताना याठिकाणी १६ हजार तरुण बेरोजगार झाले आहेत. तर मुंबईची स्थिती पाहता १२० गिरणी कारखाने असताना त्यातील ११४ कारखाने बंद पडले गेले त्याठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारल्या गेल्या असेही शरद पवार म्हणाले.

  आपल्या पक्षातून निघून जाताना या विभागातील नेत्यांनी विकासासाठी पक्ष सोडल्याची कबुली दिली पण मग प्रश्न पडतो की, पक्षात असताना तुम्हाला १५ वर्ष आमदार मग राज्य मंत्री केलं मग त्यावेळी तुम्ही नेमकं केलं काय असा सवालही शरद पवार यांनी केला.

  आम्ही पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे काम केले आहे. हा महाराष्ट्र तरुण पिढीच्या हाती देऊन याची जबाबदारी धनंजय मुंडे घेतील यात शंका नाही असेही शरद पवार म्हणाले.

  हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरी विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. यात एका बाजूला संपत्तीचा डोंगर तर दुसऱ्या बाजुला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा दर्यासागर आहे. या समुद्राच्या पाण्याने संपतीचा डोंगर उध्वस्त करण्याची ताकद तुमच्यात आहे असे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे विचारही शरद पवार यांनी व्यक्त केले.

  यावेळी शरद पवार यांनी तरुणांना विधानसभेत संधी देणार असल्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे आज बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे, बीड मतदारसंघातून संदीप क्षीरसागर, गेवराईतून विजयसिंह पंडीत, माजलगावमधून प्रकाश सोळंकी आणि केजमधून नमिता मुंदडा या युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

  आगामी विधानसभा निवडणुकीत युवावर्गाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पक्षातर्फे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्याची सुरूवात आज बीड येथून करण्यात आली आहे. आष्टी येथील उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145