आम्हाला नाणार प्रकल्प नको, आनंदवाडी प्रकल्प हवा – नितेश राणे

नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून, या प्रकपलामुळे कोकणातील पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. आम्हाला हा प्रकल्प नको असून, मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रस्तावित असलेला देवगड येथील आनंदवाडी प्रकल्प हवा अशी मागणी करत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायाऱ्यांवर धरणे आंदोलन केले.

यादरम्यान त्यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, नाणार प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. हा प्रकल्प कोकणच्या विकासासाठी नसून, कोकणाला उध्वस्त करणारा आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून, त्याठिकाणी कोकणातील मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी देवगड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आनंदवाडी प्रकल्पाबाबत सरकारने लक्ष घालून त्याला मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आपण करणार आल्याचेही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे आज मुंबईत पुरसदृश्य परिस्थितीला शिवसेनेचे नेते जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मुंबईत पाणी तुंबले. याआधी सेनेचे नेते आदित्य ठाकरे, महापौर सांगत होते की,पाण्याचा निचरा करण्यासाठी पम्पिंग स्टेशनकरता 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले. जर एवढे पैसे खर्च करण्यात आले तर मुंबईमध्ये आज ही परिस्थिती कशी निर्माण झाली. अस म्हणत हा पैसा कोठे खर्च झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.