
नागपूर – महानगरपालिका निवडणूक–२०२६च्या प्रचाराची सांगता होत असताना शहरात सत्ताबदलाची स्पष्ट चाहूल लागली असून, भाजपच्या गेल्या १९ वर्षांच्या अपयशी, भ्रष्ट आणि जनविरोधी कारभाराविरोधात नागपूरकरांचा संताप उफाळून आला आहे. मतदारांमध्ये बदलाची ठाम मानसिकता तयार झाली असून, काँग्रेसच्या ‘मिशन १०० नगरसेवक’ला ऐतिहासिक यश मिळणार असल्याचा विश्वास नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात विकास ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत नागपूरचा कौल पूर्णपणे स्पष्ट झाला आहे. भाजपच्या अपयशांना आता मतपेटीतून उत्तर देण्याचा निर्णय जनतेने घेतला असून, परिवर्तनाची लाट शहरभर दिसून येत आहे.
भाजपच्या दीर्घकाळच्या सत्ताकाळात नागपूरला भेडसावलेल्या समस्यांकडे लक्ष वेधत ठाकरे म्हणाले की, पुरामुळे झालेली कोट्यवधी रुपयांची हानी, तीव्र पाणीटंचाई, शहरात सर्वत्र साचलेला कचरा, अव्वाच्या सव्वा पाणीबिले आणि कोविड काळात कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, हे सर्व भाजपच्या अपयशी प्रशासनाचे ठळक उदाहरण आहे. या प्रश्नांमुळे नागपूरकरांची सहनशीलता संपली आहे.
त्याचवेळी काँग्रेसचा २० सूत्री लोकाभिमुख जाहीरनामा नागपूरकरांसाठी आशेचा नवा किरण ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. दरमहा ३० हजार लिटर मोफत पिण्याचे पाणी, ५०० चौ.फुटांपर्यंतच्या घरांना पूर्ण मालमत्ता करमाफी, महिला व विद्यार्थ्यांसाठी मोफत सिटी बस सेवा, बीपीएल कुटुंबांसाठी खासगी रुग्णालयांत मोफत आरोग्य तपासणी, तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचे ठोस उपाय आणि १५१ दर्जेदार इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्थापना या घोषणांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
“ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नसून, नागपूरच्या भवितव्याची लढाई आहे. १५ जानेवारी रोजी काँग्रेसच्या बाजूने मतदान करून नागपूरकर भाजपच्या अपयशी राजकारणाला कायमचा धडा शिकवतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अभूतपूर्व एकजुटीने मैदानात उतरले होते. कोणतेही अंतर्गत मतभेद न ठेवता सर्व उमेदवारांनी शिस्तबद्ध आणि एकदिलाने प्रचार केला, ज्याला नागपूरकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिकेच्या सर्व १५१ जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करण्याची संघटनात्मक ताकद, आत्मविश्वास आणि क्षमता केवळ काँग्रेसकडेच आहे, हे या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.








