
नागपूर –प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात वाठोडा पोलिसांनी कठोर पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मंगळवार, १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ही कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अपराध क्रमांक 31/2026 दाखल करण्यात आला असून आरोपीविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्याचे कलम 5, 15 तसेच बीएनएस कलम 223 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई दुपारी १ वाजताच्या सुमारास वाठोडा येथील दहन घाटामागील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अतुल पवार (वाठोडा पोलीस ठाणे) हे फिर्यादी आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जफर खान लतिफ खान पठाण (वय 23) असून तो शिवणकर नगर झोपडपट्टी, मशिदीजवळ, नंदनवन पोलीस ठाणे हद्द, नागपूर येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ‘MONO KTC’ असे लिहिलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या 20 चकऱ्या जप्त केल्या असून प्रत्येकी अंदाजे 1,500 रुपये किंमतीचा हा मांजा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय आरोपीकडील सॅमसंग कंपनीचा फिकट हिरव्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 35 हजार रुपये आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी अधिकारी कर्तव्यावर असताना विश्वसनीय बातमीदारामार्फत आरोपी प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या परवानगीने पोलीस शिपाई चेतन (7040), जितेंद्र (6861) आणि सुरेंद्र (18059) यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले. पंचासमक्ष तपासणी करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश अहेर करत असून, शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे वाठोडा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.








