
नागपूर : महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून यंदा अनेक शहरांमध्ये ‘बहुसदस्यीय प्रभाग पद्धती’ राबवली जात आहे. मात्र, या पद्धतीमुळे अनेक मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. “प्रभागात चार उमेदवार असतील आणि मला फक्त दोन किंवा तीनच आवडत असतील, तर तेवढीच मते देता येतात का? चारही मते देणे बंधनकारक आहे का? आणि ‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाली तर पुढे काय? असे अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत.
बहुसदस्यीय प्रभाग पद्धत काय आहे?
बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील उर्वरित 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबईत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडला जात असल्याने मतदाराला एकच मत द्यावे लागते. मात्र, इतर महानगरपालिकांमध्ये एका प्रभागात साधारणतः तीन ते पाच जागा असतात बहुतेक ठिकाणी चार जागांचा प्रभाग आहे. त्यामुळे मतदाराला त्या प्रभागातील सर्व जागांसाठी मतदान करण्याची संधी दिली जाते.
चार मते देणे बंधनकारक आहे का?
चार सदस्यांचा प्रभाग असल्यास, प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असतो. ईव्हीएमवर प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र बटण (अ, ब, क, ड) असते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सर्व जागांसाठी मत नोंदवणे अपेक्षित असते. सर्व मते नोंदवल्यानंतरच मशीनमधून अंतिम ‘बीप’ आवाज येतो आणि मतदान पूर्ण झाल्याची नोंद होते.
फक्त तीन उमेदवारच आवडत असतील तर?
अशा परिस्थितीत मतदारांसाठी ‘नोटा’ (NOTA) हा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही तीन मते पसंतीच्या उमेदवारांना आणि एक मत नोटाला देऊ शकता. यामुळे तुमचे मतदान पूर्ण होते आणि तुम्ही कोणत्याही नको असलेल्या उमेदवाराला मत देण्यापासून वाचू शकता.
नुकसान कोणाचे होऊ शकते?
मतदान अपूर्ण ठेवणे, गोंधळात चुकीचे बटण दाबणे किंवा मतदान प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणे—याचा थेट परिणाम प्रभागाच्या प्रतिनिधित्वावर आणि विकासावर होऊ शकतो. कमी मताधिक्याने अयोग्य उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते, आणि त्याची किंमत अखेर नागरिकांनाच मोजावी लागते.
‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाली तर काय?
जर एखाद्या जागेसाठी ‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाली, तर त्या जागेवर पुनर्निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे असतो. अशा वेळी आधीच्या निवडणुकीतील उमेदवारांना पुन्हा संधी द्यायची की नाही, याबाबत आयोग कडक भूमिका घेऊ शकतो.
थोडक्यात सांगायचं तर, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदान करताना सर्व जागांसाठी मत नोंदवणे महत्त्वाचे आहे. पसंती नसल्यास ‘नोटा’चा योग्य वापर करा कारण तुमचं प्रत्येक मत तुमच्या प्रभागाचं भवितव्य ठरवत असतं.








