कन्हान: उन्हाळ्याच्या झळा तिव्र झाल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणजे नागरी वस्तीत पाणी पुरवठा करणे होय. मात्र कन्हान नगर परिषदेचा टॅकरव्दारे चक्क दारु दुकानात पाणी पुरवठा करण्याचा उफराटा कारभार आज उजेडात आला आहे. कन्हान शहराला बारमाही वाहणारी कन्हान नदी आहे. मात्र या बारमाही नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने शहराला वारंवार पाणी टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहे. नगरपरिषदेच्या नियोजन शुन्यतेमुळे शहरातील सहाही वार्डात एक दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने टंचाई निर्माण होत असून नागरिक पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते.
नागरिकांच्या या समस्येवर फुंकर घालण्यासाठी कन्हान नगरपरिषदे द्वारा प्रत्येक वार्डात पाणी पोहचविण्यासाठी स्वतः च्या मालकीचे पाण्याचे टँकर लावले आहे. मात्र या टॅकर मध्ये नियोजन शून्यतेचा अभाव जाणवत आहे. आज दुपारी ३.४० वाजताच्या दरम्यान कन्हान नगर परिषदेचा पाण्याचा टँकर चक्क कन्हान सिमा ओलांडून कांद्री या गावातील सिमेतील दिल्ली दरबार या दारु दुकानात खाली होत होता. एकीकडे पाण्यासाठी दिवसरात्र एक करणारी आमच्या माता भगिनी पाण्याची वाट पाहत असतांना दारु दुकानात मात्र बिनबोभाट पणे पाण्याचा टॅकर खाली होत होता. या संपूर्ण प्रकरणाला संवेदनशीलतेचा अभाव असल्याचे बोलले जात असून पिण्याच्या पाण्याचा टँकर दारु दुकानात खाली करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करुन हा गोरख धंदा कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे या प्रकरणाचा भंडा फोड करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रकरणाची चौकशी करू – मुख्याधिकारी मानकर
सदर पाण्याच्या गोरख धंदाची माहिती मुख्याधिकारी मानकर यांना तातडीने देवून चौकशी करण्याची मागणी केली. मुख्याधिकारी मानकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने संबंधित चालकांना बोलावून जाब विचारात या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.