Published On : Wed, Sep 19th, 2018

पेंचमधून आजपासून शेतकर्‍यांसाठी सोडणार पाणी

Advertisement

नागपूर: जिल्ह्यातील पेंच धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या खरीप पिकांसाठी उद्या दिनांक 20 सप्टेंबर रोजी 150 दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जाणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याचे निर्देश दिले. सुमारे 15 दिवसपर्यंत पेंचमधून शेतकर्‍यांसाठ़ी पाणी सोडले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, टेकचंद सावरकर, योगेश वाडीभस्मे व या भागातील शेतकरी आज पालकमंत्री बावनकुळे यांना भेटले व निवेदन दिले. पाऊस नसल्यामुळे धान उत्पादक शेतकरी व अन्य पिके घेणार्‍या खरीपाच्या पिकाची अवस्था सध्या अत्यंत खराब आहे. पिकांना पाणी मिळाल्यास जीवदान तर मिळेलच शिवाय कोट्यवधीची पिके शेतकर्‍याच्या हातून जाणार नाहीत. पिकांना सध्या असलेली पाण्याची गरज लक्षात घेता पालकमंत्र्यांनी उद्या पेंचमधून शेतकर्‍यांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनीही हे मान्य करीत उद्या वरील तीनही तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी पाणी सोडणार असल्याचे सांगितले. धान पिकाला या पाण्यामुळे जीवदान मिळणार आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत शेतकर्‍यांना पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पावसाने दिलेली उसंत व सध्या धान उत्पादक शेतकर्‍यांना पाण्याची असलेली निकड लक्षात घेता पेंचमधून शेतकर्‍यांच्या खरीप पिकासाठ़ी पाणी सोडण्यात येणार आहे.

मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे पेंचमध्ये जलसाठा अत्यंत कमी प्रमाणात असतानाही शेतकर्‍यांच्या पिकासाठी या पाण्याचा वापर करण्याचे ठरले आहे. शासनाने शेतकर्‍यांना व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊन 1015 कोटी रुपयांच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला यापूर्वीच मान्यता दिली आहे. या उपक्रमातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.