Published On : Sun, Nov 24th, 2019

रस्तेबांधणीच्या कामातून जलसंवर्धनाचा बुलढाणा पॅटर्न देशभर राबवावा

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्यांने नाले, नदी यांच्या खोलीकरण व रुंदीकरण यांच्या माध्यमातून रस्तेबांधणीमध्ये सामग्री वापरल्याने बुलढाणा जिल्ह्यातील जलसोत्रांच्या जलसंधारण क्षमतेमध्ये वाढ झाली असून जलसंवर्धनाचा हा बुलढाणा पॅटर्न देशभर पाणी टंचाई असलेल्या क्षेत्रामध्ये राबवावा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात आयोजित अ‍ॅग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनात केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब ठेंग उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील नाले, नदी, तलाव यांच्या खोलीकरण तसेच रुंदीकरण यांच्या द्वारे जवळपास 52.10 लाख मुरूम माती व तत्सम बांधकाम सामग्री उपलब्ध झाली व त्याद्वारे जवळपास 5,510 थाउजंड क्युबिक मीटर (टीसीएम) एवढी जलसंधारण क्षमता या जिल्ह्यात मध्ये निर्माण झाली. असे प्रकल्प विदर्भ तसेच राज्यातील इतर भागात राबविल्यामुळे जवळपास 126.05 लाख घन मीटर सामग्री खोलीकरणाच्या कामातून प्राप्त झाली असून यामुळे राज्याच्या जलसंधारण क्षमतेमध्ये 12,605 टीसीएम वाढ झाली असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा 12 प्रकल्पामुळे सुमारे 22,800 विहिरींचे पुनर्भरण झाले व 1525 हेक्‍टर इतके सिंचन क्षेत्र वाढले. विदर्भात 325 ठिकाणी झालेल्या अशा प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार 8,580 टीसीएम एवढी जलसंधारण क्षमता वाढली असे त्यांनी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पाद्वारे झालेल्या जलसंधारणाचा पॅटर्न राज्यातील व देशातील इतर दुष्काळी भागांना सुद्धा आपल्या स्थानिक प्रशासनातर्फे व स्वयंसेवी संस्थांतर्फे राबवावा असे त्यांनी यावेळी नमूद केले.बुलढाणा जिल्ह्यात अमरापुर तलावन शेलोडी तलावन हिवरखेड तलाव, लांजुड सिंचन तलाव पिंपराळा सिंचन तलाव अशा विविध भागांमध्ये ही जलसंधारणाची कामे झालेली आहेत.