Published On : Thu, May 2nd, 2019

पाणी अडविल्याशिवाय आणि जिरविल्याशिवाय पाणीटंचाईवर मात करणे शक्य नाही- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले

Advertisement

नागपूर: दुष्काळी भागातच नव्हे, तर ज्या भागात दुष्काळ नाही अशा गावांमध्येही जलसंधारणाची कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे. पाणी अडविल्याशिवाय आणि जिरविल्याशिवाय पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. जलसंधारणाच्या कामांची ही चळवळ पुढील पाच वर्षांपर्यंत सुरू ठेवावी, असे आवाहनही ग्रामस्थांना केले.

नरखेड तालुक्यात पाणी फाउंडेशनतर्फे ‘वॉटरकप स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नरखेड तालुका सहभागी झाला आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. या कामांना मंगळवारी पालकमंत्री बावनकुळे यांनी भेट दिली. ग्रामस्थांशी संवाद साधला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या मालापूर, मन्नाथखेडी, गायमुख, मोवाड, खैरगाव, खरसोली, रानवाडी, दातेवाडी, रामठी या गावांत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या खोदकामाला पालकमंत्र्यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, चरणसिंग ठाकूर, सभापती उकेश चव्हाण, सभापती संदीप सरोदे, सभापती राजू हरणे, श्यामराव बारई, मनोज कोरडे, जितू गुप्ता व अन्य मान्यवर उपस्थित होते..

वाढत्या तापमानामुळे सकाळी ११ नंतर कामे करणे शक्य नसल्यामुळे दररोज दोन पाळ्यांमध्ये विहीर खोलीकरण, नाला खोलीकरण, शेतात बंधारा बांधणे, शोषखड्डे, आगपेटीमुक्तशिवार, वृक्षसंवर्धन ही कामे केली जात आहेत. पहाटे ५ वाजता या कामांना सुरुवात होते. सकाळी ११ वाजेपयंर्त पहिल्या पाळीतील काम चालते. सायंकाळी ५ नंतर रात्री ९ ते १० वाजेपयंर्त लाइट लावून कामे केली जात आहेत. पुरुष, महिला, विद्यार्थी, वृद्धही आपल्या ताकदीप्रमाणे ही कामे करीत आहेत. प्रत्येक गावातून किमान २०० वर महिला आणि पुरुष या कामात श्रमदान करून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत आहेत. या कामांमुळे गावाचा फायदा आणि स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे बक्षीसही मिळणार आहे..

२४ तास विहिरीवरील पंप सुरू ठेवून जमिनीतून पूर्ण पाणी उपसल्या गेल्यामुळे काटोल नरखेडचा हा भाग दुष्काळी आणि पाणीटंचाईचा ‘डार्क बेल्ट’ म्हणून समजला जातो. पाण्याची पातळी वाढविण्यासाठ.ी जलसंधारणाची कामे हीच या भागासाठी काळाची गरज ठरणार आहे. मालापूर या गावात श्रमदानातून २००० घनमीटर तर मशीनच्या माध्यमातून २००० घनमीटर खोदकाम झाले आहे. गोंडेगाव येथे श्रमदानातून ९०० घनमीटर तर मशीनच्या माध्यमातून ७०० घनमीटर, गायमुख येथे .श्रमदानातून ३०० घनमीटरचे काम झाले आहे. दातेवाडी येथे श्रमदानातून एक हजार घनमीटर तर मशीनच्या माध्यमातून चार हजार घनमीटर जलसंधारणाची कामे झाली आहेत. रानवाडी येथे श्रमदानातून २००० तर मशीनच्या माध्यमातून २० हजार घनमीटर खोदकाम झाले आहे. खरसोली येथे श्रमदानातून ४ हजार तर मशीनच्या माध्यमातून ६ लाख घनमीटर जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या गावांमध्ये गावाला लागूनच तलाव आहेत, त्या तलावातील माती काढून ते अधिक खोल करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या..