Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सार्वजनिक ठिकाणांवर वॉटर एटीएम सुरू करणार जलप्रदाय विशेष समितीचा स्तुत्य निर्णय

Advertisement

नागपूर: उद्याने, मैदाने, बस स्थानके यासह इतर सार्वजनिक ठिकाणांवर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम उभारण्याचा निर्णय जलप्रदाय विशेष समितीने घेतला आहे.

जलप्रदाय विशेष समितीची बैठक सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 9) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती श्री. विजय (पिंटू) झलके, नासुप्रचे विश्वस्त व नगरसेवक श्री. शेषराव गोतमारे, नगरसेविका श्रीमती मंजुषा चाचेरकर, नगरसेविका श्रीमती तसनीम परवीन ताजी, नगरसेवक श्री. सुहास नानवटकर, नगरसेवक श्री. रामदास शाहू यांच्यासह अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर व ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.

जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांनी सार्वजनिक ठिकाणी वॉटर एटीएम मशीन लावण्याचा प्रस्ताव मांडला. यासंदर्भात समितीच्या सदस्यांना मशीनचे सादरीकरण करण्याची सूचना श्री. पिंटू झलके यांनी केली. या मशीनच्या सादरीकरणावर प्रस्ताव तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.

बिल भरणा केंद्रांमध्ये वाढ

Advertisement

पाण्याचे बिल भरण्यासाठी नागरिकांसाठी शहरात केवळ 25 बिल भरणा केंद्र आहेत. यात वाढ करण्याची सूचना श्री. विजय (पिंटू) झलके यांनी केली. शहरात 250 पर्यंत बिल भरणा केंद्र सुरू केल्यास नागरिकांना सोईचे होईल तसेच पाणी कराची वसुलीत वाढ होईल, अशी सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पाण्याचे बिल भरण्यासाठी ई-वॉलेटची व्यवस्था करण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहरातील सार्वजनिक विहीरींची साफसफाई करण्याच्या संदर्भात आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे रस्त्यावर खोदकाम करून जलवाहिनीला हानी पोहोचविणाऱ्यावर पोलिसमध्ये तक्रार करण्याचे यावेळी सुचविण्यात आले. अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता मोबाईल कंपन्या किंवा इतर विकास संस्था रस्त्यावर खोदकाम करून जलवाहिनीला हानी पोहोचवित असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. यासंदर्भात मनपाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सभापती श्रीमती दिव्या धुरडे यांनी सांगितले. समितीच्या सदस्यांनी सांगितलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्वरित निपटारा करण्यात यावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.