Published On : Wed, Aug 5th, 2020

5000 बेडच्या कोव्हिड केअर सेंटरवर पाणी

Advertisement

– दूरदृष्टी अभावी ३५ लाख पाण्यात

नागपूर– कळमेश्वर मार्गावर राधास्वामी सत्संग न्यासच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पाच हजार बेडची क्षमता असलेल्या कोव्हीड केअर सेंटरचा एकाही रुग्णाला दाखल न करताच तीन महिन्यात बोजवारा उडाला. ११ मे रोजी सुसज्ज दिसत असलेली स्थिती सुंदर स्वप्न होते की काय, अशी शंका यावी, एवढे आजचे वास्तव भयानक आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात शहरात किंवा ग्रामीण भागात मोठा पाऊस पडत असल्याच्या वास्तव्याची जाणीव न ठेवता केलेला महापालिकेचा हा प्रयोग पावसामुळे पूर्णपणे फसल्याचे चित्र असून या कोव्हीड केअर सेंटरकडे महापालिकेचे कुणी अधिकारीही फिरकून पाहात नसल्याचे समजते.

शहरात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे खाजगी रुग्णालयातही गर्दी होत आहे. सामान्य, गरीब नागरिकांना खाजगी रुग्णालयाचे दर परवडणारे नाही, त्यामुळे या नागरिकांनाही आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी आज अचानक पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले. आज तसेच पुढील महिन्यातही पावसामुळे हे कथित कोव्हीड केअर सेंटर काहीच कामाचे नसल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे येथील बेडवरील संपूर्ण गाद्या ओल्या झाल्या आहेत. अनेक बेड कोपऱ्यात गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास कोव्हीड केअर सेंटरमध्ये त्यांना आरोग्य सुविधा मिळेल, तेथेच उपचारही होतील, असा दावा त्यावेळी महापालिका प्रशासनाने केला होता. आज शहरात मोठ्‍या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे.

बेड मिळत नसल्याने त्यांना आता घरीच विलगीकरणात ठेवण्याची वेळ आली आहे. या कोव्हीड सेंटरबाबत केलेला दावा आता कुठे गेला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांची टिम कार्यरत असणार असाही दावा करण्यात आला होता. परंतु कोव्हीड केअर सेंटर तयार करताना ना मनुष्यबळाचा ना शहरातील जुलै, ऑगस्टमधील पावसाचा विचार करण्यात आला, असे दिसून येत आहे. एकूणच दूरदृष्टीअभावी येथे गाद्या, चादर, उशी आदीवर महापालिकेने केलेला ५ लाखांचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कचरा पेटीही एका कोपऱ्यात पडलेल्या अवस्थेत आहेत. ११ मे रोजी मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या या कोव्हीड केअर सेंटरमध्ये श्वान फिरताना दिसून आले. एवढेच नव्हे तर पावसामुळे संपूर्ण परिसराच चिखलाचे साम्राज्य असून पायी फिरणेही कठीण आहे. ‘नाम बडे, दर्शन खोटे’ अशी महापालिकेची स्थिती आहे.

सुक्ष्मनियोजन फसले
कोव्हीड केअर सेंटरच्या निर्मितीची संकल्पना मे महिन्यात तयार झाली. त्यावेळी राधास्वामी सत्संग मंडळाचा परिसर अनुकूल होता. मात्र पावसाच्या दिवसांत कोव्हीड केअर सेंटरचे काय होणार? याचा विचारच संकल्पनेत करण्यात आला नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी सांगितले. जुलै, ऑगस्टमध्ये रुग्ण वाढणार असल्याचे भाकित काही संशोधकांनी केले होते. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने सुक्ष्मनियोजन फसले.

२४ तासच्या काढल्या होत्या निविदा
साहित्य खरेदीसाठी केवळ २४ तासांची निविदा काढली होती. एवढ्या घाईने निविदा काढून ३५ लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र आज या साहित्याची दुरावस्था झाली आहे. आजपर्यंत एकही कोव्हीड रुग्ण येथे आला नाही. रुग्ण येथे येण्यापूर्वीच येथील चादर, उशाही गायब झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण खर्च पाण्यात गेला असून महापालिकेच्या या नुकसानासाठी आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी केला.