Published On : Wed, Sep 19th, 2018

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडून अधिका-यांना इशारा

Advertisement

Mahavitaran logo

नागपूर: मीटर वाचकाने रिडींग घेतेवेळी ग्राहकांकडे आढळलेल्या वीजचोरीची माहिती देऊनही त्यापैकी अनेक ग्राहकांवर कारवाई टाळून ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल सादर करण्यात आले आहे, अश्या सर्व ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फ़त करण्याचा इशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना दिला आहे.

अनेक मीटर वाचकांनी ग्राहकांकडे होत असलेल्या वीजचोरीची माहिती स्वयंस्फ़ुर्तीने महावितरणकडे दिली, त्या माहितीची योग्य शहानिशा करण्याच्या सुचना संबंधित अभियंत्यांना देऊनही संबंधित ग्राहक मिळाला नाही, किंवा तेथे चोरी नाही यासारखे अहवाल मिळाल्याने अश्या वीज ग्राहकांची तपासणी भरारी पथकामार्फ़त करण्यात येऊन चुकीचा अहवाल देणा-या सर्व संबंधित अधिका-यांविरोधात कार्यवाही करण्यात येणार असल्याने सप्टेबर अखेरपर्यत अश्या सर्व ग्राहकांची रितसर तपासणी करून योग्य अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्याम्नी केल्या आहेत.

थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्काचा भरणा करूनही वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकांची त्वरीत पडताळणी करण्याचे आदेशही प्रादेशिक संचालक यांनी दिले आहेत. परिक्षेत्रातील पुनर्जोडणी शुल्काचा भरणा केलेले 16776 तर थकबाकीचा भरणा केलेल्या 7311 ग्राहकांचा वीजपुरवठा अद्याप सुरु झालेला नाही. अश्या प्रत्येक ग्राहकांची पडताळणी सप्टेबर अखेरपर्यंत पुर्ण करण्यात यावी, याशिवाय वाढ़ीव वीज वापराच्या प्रमाणात लघुदाब गैरकृषी वीज विक्री वाढही अपेक्षित असल्याने परिक्षेत्रातील सर्व मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांनी यासाठी प्रयत्न करावेत. एप्रिल ते ऑगस्ट या काळात अकोला आणि वर्धा मंडलातील वीजहानी वाढली असून आकोट, वर्धा आणि कॉग्रेसनगर विभागातील लघुदाब गैरकृषी वीज विक्री ही वाढ़ीव वीज वापराच्या तुलनेत अनुरूप नसल्याबाबतही त्यांनी संबंधित अभियंत्यांची कानउघाडणी केली आहे.

अकोला, मलकापूर, अमरावती, अंजगाव आणि अचलपूर शहरांची एकूण पारेषण व वाणिज्यीक वीज हानी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासंबंधीची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंता, आणि अधीक्षक अभियंत्यासह शहराच्या प्रभारी अभियंत्यावर निश्चित केली जात असून या शहरांसाठी देय असलेल्या अनुदान घटकांची हानी झाल्यास त्यासंबंधी जबाबदेही निश्चित करुन दोषींविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एप्रिल ते ऑगस्ट 2018 दरम्यान अकोला परिमंडल आणि यवतमाळ मंडळात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील वसुली कार्यक्षमता कमी झाली असल्याने मुख्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या थकबाकीदारांच्या यादीवर कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी सर्व संबंधितांना केल्या आहेत.

सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडील वीज देयकाच्या वसुलीचे प्रमाण सर्वत्र अत्यल्प असल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरीत खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.ऑगस्ट महिनाअखेर एकूण मीटर वाचनापैकी केवळ 37 टक्के नोंदीचे प्रमाणीकरण झाले होते ते प्रमाण आता 65 टक्क्यापर्यंत झाले असून सप्टेंबर अखेरपर्यंत ते 100 टक्के करण्यात यावे, सामान्यपेक्षा 4 पट अधिक आलेल्या वीज बिलांचे 100 टक्के सत्यापन करावे, मंद आणि दोषपूर्ण मीटरच्या बदल्यात लावण्यात आलेल्या मीटरवरील नोंदीनुसार मागिल वीज वापराचे योग्य ते मूल्यमापन करणे, त्यांच्या वापराशी सुसंगत देयक संबंधित ग्राहकाला देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.

बिल दुरुस्ती किंवा ग्राहकांना दिल्या जाणा-या जमा रकमेच्या एकूण देयकांची रक्कम ही त्या महिन्याच्या एकूण मागणीच्या 1 टक्यापेक्षा अधिक नसावी. विविध स्तरांवर सर्व प्रलंबित बिल दुरुस्ती, बिल पुनरावृत्ती आदीचे प्रमाण बंद करण्यात यावेत. बिल दुरुस्ती प्रकरणांची तपासणी करताना चुकीच्या दुरुस्त्या, क्रेडिट बिल्स आदीची जवाबदारी निश्चित करण्याच्या सुचनाही करण्यात आल्या.

संपुर्ण परिक्षेत्रातील 1134 ग्राहक मीटरच्या मार्फ़त वीज वापरत असतांनाही त्यांचे बिल तयार होत नाही आणि माहिती तंत्रज्ञान विभागातही या ग्राहकांची नोंद नाही. अशा ग्राहकांवर कारवाई करण्याच्या सुचनाही खंडाईत यांनी केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात अधिक हानी असलेल्या शहरांची वीजहानी कमी कराण्यासाठीचे नियोजन तसेच शहरी भागातील पायाभूत सुविधांचे मजबूतीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करा. सोबतच जिल्हा मुख्यालयांच्या सुशोभीकरणाच्या कामांचे अंदाजपत्रकासोबतच वन क्षेत्रातील दुर्घटना टाळण्यासाठी योग्य अंदाजपत्रक त्वरीत तयार करण्याचया सुचनाही भालचंद्र खंडाईत यांनी केल्या आहेत.