Published On : Tue, Feb 11th, 2020

मार्च अखेरपर्यंत दर रविवारी वार्डनिहाय कर वसुली शिबिर

कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांचा निर्णय

नागपूर : नागरिकांना संपत्ती कर भरण्यासाठी सुविधा व्हावी याकरिता कर वसुली अभियानाअंतर्गत प्रत्येक रविवारी कर विभागाद्वारे निर्धारित वार्डनिहाय कर वसुली शिबिर घेण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत दर रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विविध ठिकाणी हे शिबिर घेण्यात येणार आहेत. यासंबंधी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासंदर्भात मंगळवारी (ता.११) कर आकारणी व कर संकलन समिती सभापती कक्षात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समिती सभापती महेंद्र धनविजय यांच्यासह उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त किरण बगडे, दहाही झोनचे कर विभागाचे सहायक अधीक्षक उपस्थित होते.

संपत्ती कर भरण्याकरीता मनपातर्फे आवाहन केले जाते. मात्र अनेकदा झोन कार्यालयामध्ये नागरिकांना मोठ्या रांगेमध्ये उभे राहावे लागते. मनपाचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत संपत्ती कर आहे. त्यामुळे कर भरण्याकरीता नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कर विभागाद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या वार्डमध्ये आता दर रविवारी कर वसुली शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. येत्या १६ फेब्रुवारीपासून मार्च अखेरपर्यंत प्रत्येक रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत दहाही झोनमधील कर विभागाच्या विविध वार्डमध्ये हे शिबिर घेण्यात येणार आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाही पूर्ण करून नागरिकांना सुविधा निर्माण करून द्यावे, असे निर्देश कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.

कर विभागासंदर्भात दैनंदिन कर वसुली, लिलावासाठी काढण्यात आलेल्या मालमत्ता, जाहिरनामा आदींची झोननिहाय माहिती दररोज मुख्यालयात सादर करण्याचेही निर्देश सभापतींनी यावेळी दिले.