Published On : Thu, Sep 26th, 2019

पोलिस निरीक्षक पराग पोटे यांनी झेलले शस्त्राचे वार 

वर्धा : येथील सिव्हील लाईन भागातील न्यायालयाच्या समोर हातात धारदार शस्त्र घेऊन दोन गटात वाद सुरू असल्याचे लक्षात येताच खाकी वर्दीत असलेले पोलीस अधिकारी पराग पोटे यांनी मध्यस्ती करीत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान आरोपीने त्याच्या हातातीच शस्त्राने थेट पोलीस अधिकारी पोटे यांच्यावर वार केल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

विशेष म्हणजे पोलीस अधिकारी पराग पोटे हे सध्या नागपूर येथे कार्यरत असून त्यांनी यापूर्वी सेवाग्राम ठाण्यात आणि स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सदर पोलीस अधिकाऱ्याने वेळीच मध्यस्ती केली नसती तर मोठी घटनाच घडली असती अशी चर्चा घटनास्थळी होती.वर्धा शहराशेजारील आलोडी येथे एका महिलेचा तुकडे तुकडे केलेला मृतदेह आढळला होता. त्यावेळी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मोहन वरठी याला पोलिसांनी अटक केली होती. याच प्रकरणातील साक्ष असल्याने पोलीस अधिकारी पोटे हे वर्धा येथील न्यायालयात आले होते.

ते न्यायालयाच्या समोर असता दोन गटात वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान त्यांनी पुढाकार घेत वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. याचवेळी वाद करणाऱ्यापैकी एकाने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने पोटे यांच्यावर वार करून त्यांना जखमी केले.

ही बाब तेथेच असलेल्या पोलीस कर्मचारी देवानंद भाजीपाले यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत काहींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. मारोती माणिक मरघडे, राखी मारोती मरघडे, सोहम अशोक ढेंगरे, मनोज मारोती मरघडे, नेहा मनोज मरघडे, सविता अशोक मरघडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.