वर्धा : वर्धा जिल्ह्यात सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) गॅसच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम आदमी पक्षाने वाहनचालकांना पूर्वीप्रमाणे दर्जेदार सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य मनोज शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
निवेदनानुसार, अलीकडे सीबीजी गॅस भरल्यानंतर अनेक वाहनांमध्ये इंजिन मिसफायर होणे, वाहनाचा पिकअप कमी होणे आणि रस्त्यातच वाहन बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ऑटोचालकांसह खासगी वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, वाहनचालकांना तातडीने दर्जेदार सीएनजी गॅसचा पुरवठा सुरू करावा आणि वर्धा शहरात स्वतंत्र सीएनजी गॅस सेंटर सुरू करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने प्रशासनाला दिला आहे.




