
वर्धा: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या वतीने गावातील मुख्य मार्गावरून भव्य रूट मार्च काढण्यात आला.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रूट मार्च पार पडला.
मुख्य मार्गावरून रूट मार्च
रूट मार्चची सुरुवात अल्लीपूर पोलीस स्टेशनपासून झाली. त्यानंतर गावातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि महत्त्वाच्या चौकांमधून पोलिसांचे पथक मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.
या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार संगीता हिलोंडे यांनी केले.
सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन
सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरे करावेत. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला.
या रूट मार्चमध्ये ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्यासह जमादार, पोलीस कर्मचारी तसेच गृह रक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोलिसांच्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
प्रतिनिधी : सतीश काळे, वर्धा




